spot_img
spot_img

BIG UPDATE! तीन बळींनंतर भावाची पत्नी अन् मुलगीही निशाण्यावर? शेलूद-दिवठाण्यात शोध घेतल्याची धक्कादायक माहिती; कुठे पोलीस दिसले, कुठे घर बंद…! एसपी निलेश तांबेंची तत्पर धाव, पोलीस पथकांची नाकेबंदी अन् मुलाला पहाटेच बेड्या; मुख्य आरोपी दीपक सुरडकरचे पनवेलमध्ये आत्मसमर्पण!

चिखली (हॅलो बुलढाणा/सैय्यद साहिल) जन्मदात्या आईसह सख्खा भाऊ आणि तरुण पुतण्याच्या हत्येने जिल्ह्याला हादरवणाऱ्या सोमठाणा तिहेरी हत्याकांडात मोठी घडामोड समोर आली आहे. घटनेनंतर फरार झालेला मुख्य आरोपी दीपक फत्तेसिंग सुरडकर याने शुक्रवारी पनवेल येथील पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले. त्याचा मुलगा जगदीश दीपक सुरडकर (वय २१) याला चिखली पोलिसांनी ९ ऑक्टोबरच्या पहाटे ३:३५ वाजता अटक केली.

आईने तीन एकर शेती पुतण्याच्या नावावर बक्षीसपत्राद्वारे दिल्याच्या रागातून जुन्या जमिनीच्या वादाला हिंसक वळण मिळाल्याचा आरोप आहे. ८ ऑक्टोबरला सकाळी शेतात झालेला वाद गावकऱ्यांनी मिटवला; मात्र सायंकाळी रक्तरंजित घटना घडली.

शेतीकाम आटोपून परतणारे संजय सुरडकर (वय ५५) आणि त्यांचा मुलगा रणजीत (वय २५) दुचाकीची वायर तुटल्याने गाडी लोटत आणत होते. दीपकच्या घरासमोर पोहोचताच दीपक आणि जगदीश यांनी चाकू व काठीने दोघांवर हल्ला केल्याचा आरोप आहे. त्यानंतर घरात घुसून ७० वर्षीय सरस्वतीबाई सुरडकर यांच्यावरही प्राणघातक वार करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

पत्नी-मुलीलाही शोधल्याची माहिती!

तिघांच्या हत्येनंतर आरोपीने संजय यांच्या पत्नी मुक्ता आणि मुलीचा शोध घेण्यासाठी शेलूद व दिवठाणा येथे गेल्याची माहिती समोर आली आहे. मुलीचे घर बंद असल्याने आणि शेलूदमध्ये पोलीस दिसल्याने तो पसार झाल्याचे सांगण्यात येत आहे. या तपशिलांची अधिकृत पुष्टी महत्त्वाची ठरणार आहे.

घटनेनंतर पोलीस अधीक्षक डॉ. निलेश तांबे आणि निरीक्षक भूषण गावंडे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत नाकेबंदी व शोधमोहीम राबवली. दरम्यान, ९ ऑक्टोबरला शेलूद येथे तिन्ही मृतदेहांवर एकाच चितेवर अंत्यसंस्कार झाले. विजय सुरडकर यांनी अग्नी दिला. एकाच कुटुंबातील तीन पिढ्यांना निरोप देताना गाव शोकसागरात बुडाले.

मुक्ता सुरडकर यांच्या फिर्यादीवरून दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा क्रमांक ८९५/२०२६ दाखल असून, निरीक्षक भूषण गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!