spot_img
spot_img

EXCLUSIVE सागवानाची कत्तल; कारवाईत ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’ तर नाही ना? घाटबोरीत वनपाल-वनरक्षक निलंबित; महिला वनरक्षकांच्या आरोपांनंतर अधिकाऱ्यांच्या भूमिकेचीही चौकशी होणार का?

मेहकर (हॅलो बुलढाणा) जंगल राखणाऱ्यांच्या हद्दीतच सागवानाची अवैध कत्तल झाली आणि आता दोन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कुऱ्हाड कोसळली! मात्र, कारवाई एवढ्यावरच थांबणार की वृक्षतोडीमागील संपूर्ण साखळी उघड होणार? घाटबोरी वनपरिक्षेत्रातील भोसा बीट प्रकरणात महिला वनरक्षकांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

प्राथमिक चौकशीनंतर बुलढाण्याचे उपवनसंरक्षक जमीर शेख यांनी ७ ऑक्टोबर रोजी वनपाल जी. ए. मंजुळकर आणि वनरक्षक एस. के. मोरे यांना निलंबित केले. या प्रकरणात आतापर्यंत तीन आरोपींना अटक झाल्याची माहिती आहे. मात्र, निलंबन म्हणजे संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला, असे मानता येणार नाही.

महिला वनरक्षक एम. के. मोरे यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी अंकुश येवले यांच्या संगनमताने वृक्षतोड झाल्याचा आरोप केल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी डोणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याचेही सांगण्यात येते.

आज, १० ऑक्टोबर रोजी मुख्य वनसंरक्षक ज्योती बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील समितीकडून चौकशी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ही चौकशी फक्त निलंबित कर्मचाऱ्यांभोवती फिरणार की वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कर्तव्यपालनाचीही कसोटी लागणार?

किती झाडे तोडली? लाकूड कुठे गेले? वाहतूक कोणी केली? खरेदीदार कोण? परवानग्यांचा गैरवापर झाला का? या प्रश्नांची उत्तरे मिळाल्याशिवाय चौकशी पूर्ण कशी म्हणायची?

समितीने घटनास्थळाची पाहणी, तोडलेल्या झाडांची मोजणी, जप्त लाकडाचा ताळमेळ आणि संबंधितांचे जबाब तपासणे गरजेचे आहे. शेतजमिनीवरील वृक्षतोड परवानग्या, लगतच्या जंगलातील नुकसान आणि ठेकेदारांच्या व्यवहारांची पडताळणीही व्हायला हवी. महिला वनरक्षकांच्या तक्रारीतील प्रत्येक आरोप पुराव्यांच्या कसोटीवर तपासला गेला पाहिजे.दोन निलंबनांनी फाईल बंद नको; जंगल लुटणाऱ्या प्रत्येक दोषीपर्यंत कारवाई पोहोचली पाहिजे! अन्यथा ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’ दिल्याचा संशय अधिक गडद होईल.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!