जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा/ज्ञानदेव राजनकर) मुक्या जनावरावर एवढी निर्दयी वार करण्याची हिंमत आली कुठून? वडगाव गड येथे गाईच्या पोटात भाला खुपसून तिला गंभीर जखमी केल्याची घटना ५ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास उघडकीस आली. मिळालेल्या अतिरिक्त माहितीनुसार, सदर गाईचा मृत्यू झाला आहे.
तक्रारीनुसार, गावात ग्रामसभा सुरू असताना शेतकरी अनंता गोपाल सरदार यांना सुदाम टापरे यांचा फोन आला. अहमद शहा यांच्या वाड्याजवळ एका गाईच्या पोटात भाला खुपसलेला असल्याचे त्यांनी सांगितले. माहिती मिळताच सरदार, मिलन हसन माळवनकर आणि गोविंद जनार्दन काटोळे यांनी ग्रामसभा सोडून घटनास्थळी धाव घेतली. तेथे गाईच्या पोटात भाला खुपसलेला दिसल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे.
सरदार यांनी तत्काळ पोलीस हवालदार बाळकृष्ण पवार यांना माहिती दिली. त्यानंतर जळगाव जामोद पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३२५ अंतर्गत गुन्हा क्रमांक ६३१/२०२६ दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खाडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
हा भाला कोणी खुपसला? या क्रूर कृत्यामागचे कारण काय? याची उत्तरे पोलीस तपासातून समोर येणे आवश्यक आहे. मुक्या जीवावर झालेल्या हल्ल्याचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीचा तातडीने शोध घेऊन कठोर कारवाई व्हायला हवी.




Total Users : 3554029