बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बुलढाण्याच्या मातीतल्या कलाकारांना संधी देणारा पहिलाच चित्रपट अन् प्रदर्शनाआधीच आंतरराष्ट्रीय पुरस्कारांची दमदार कमाई! बुलढाणा अर्बन मिडिया हाउसची निर्मिती असलेला ‘धाराऊ’ येत्या २३ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. गोमाता आणि गोहत्येच्या विषयावर आधारित या चित्रपटाने आतापर्यंत २६ आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळविल्याची माहिती बुलढाणा अर्बन परिवाराचे राधेश्याम चांडक यांनी दिली.
विशेष म्हणजे, पाकिस्तानातील पेशावर येथे झालेल्या स्पर्धेत चित्रपटाला उत्कृष्ट कथानकाचे पारितोषिक मिळाल्याचेही चांडक यांनी सांगितले. त्यामुळे प्रदर्शनापूर्वीच ‘धाराऊ’विषयी उत्सुकता वाढवणारी ही बाब ठरली आहे.
शंभूराजांच्या जन्मानंतर राजमाता सईबाई आजारी पडल्या. छोट्या बाळराजांना दूध मिळेनासे झाले, तेव्हा त्यांच्या पोषणासाठी पुढे सरसावलेल्या धाराऊंच्या ऐतिहासिक संदर्भाची आठवणही चांडक यांनी यानिमित्ताने करून दिली.
९० मिनिटांच्या या चित्रपटात जास्तीत जास्त स्थानिक कलाकारांना संधी देण्यात आली आहे. बुलढाणा अर्बन परिवाराचा चित्रपटनिर्मितीतील हा पहिलाच प्रयोग असल्याने स्थानिक कलागुणांसाठीही हे महत्त्वाचे पाऊल आहे.
“आपली ९० मिनिटे देऊन चित्रपटाला प्रतिसाद द्या आणि आमचे प्रोत्साहन वाढवा, असे आवाहन चांडक यांनी केले आहे. राष्ट्रमाता माँ जिजाऊंच्या जन्मस्थानाची माहिती देणारा संस्थेचा माहितीपट यूट्यूबवर उपलब्ध असून, तो पाहून अभिप्राय नोंदविण्याचेही आवाहन त्यांनी केले.












Total Users : 3552935