बुलढाणा (हॅलो बुलढाणा) मोबाईलच्या स्क्रीनमध्ये हरवत चाललेल्या चिमुकल्यांच्या अंगातील कला थेट रंगमंचावर आणण्याचा बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचा प्रयत्न अक्षरशः सुपरहिट ठरला! वृत्तेश्वर गणेशोत्सवांतर्गत आयोजित ‘नाच रे मोरा’ बालनृत्य स्पर्धेच्या ग्रॅण्ड फिनालेत चिमुकल्या कलाकारांनी असा काही जलवा दाखविला की उपस्थित अक्षरशः थक्क झाले.
पहिली ते चौथीच्या बालगटासाठी रंगलेल्या या स्पर्धेत ऑडिशनमधून निवडलेल्या टॉप-10 स्पर्धकांमध्ये विजेतेपदासाठी जोरदार चुरस पाहायला मिळाली. पारंपरिक नृत्य, देवीचा गोंधळ आणि भक्तिगीतावर बहारदार सादरीकरण करीत कु. सान्वी विशाल संजीवनी हिंगणे हिने ₹7 हजारांचा प्रथम पुरस्कार पटकावत विजेतेपदावर मोहोर उमटवली. तर कु. सान्वी खरात हिने ₹5 हजारांचा द्वितीय पुरस्कार मिळवत उपविजेतेपद पटकावले. कु. अधिरा सगळे हिने ₹3 हजारांचा तृतीय पुरस्कार मिळविला. अधिरा नारखेडे आणि स्वरूषि भालेराव यांना प्रत्येकी ₹500 चे प्रोत्साहनपर पारितोषिक देण्यात आले.
रंजना बोरीकर आणि मनोज नंद्रेकर यांच्या परीक्षणातून विजेत्यांची निवड करण्यात आली. अधिरा बोर्डे, स्वरा स्वामी, श्लोक हिवाळे, आर्या जाधव आणि अर्शिका पाटणकर यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेपूर्वी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांच्या हस्ते वृत्तेश्वराची आरती झाली. विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही उपस्थिती लावत स्पर्धकांचा उत्साह वाढविला. सिने कलाकार कृष्णा बोरीकर हिने तिच्या आगामी चित्रपटाबाबत संवाद साधला, तर गायक पत्रकारांच्या कराओके गीतांनी कार्यक्रमाला वेगळाच रंग चढविला.एकूणच, ‘नाच रे मोरा’च्या मंचावर त्या दिवशी स्पर्धा नव्हतीच… चिमुकल्या प्रतिभेचा अक्षरशः विस्फोट झाला!











Total Users : 3514325