spot_img
spot_img

BREAKING रताळीत शेतकरी संकटाचा आणखी एक बळी! १० एकर सोयाबीन उद्ध्वस्त, अडीच लाखांचा खर्च पाण्यात; वडिलांचे कर्जमाफीच्या यादीत नावही नाही… २६ वर्षीय आकाशने संपवले जीवन!

सिंदखेडराजा (हॅलो बुलढाणा/वसीम शेख) तालुक्यातील रताळी येथे शेतीतील प्रचंड नुकसान, वाढता आर्थिक ताण आणि कुटुंबावरील कर्जाच्या ओझ्याच्या पार्श्वभूमीवर २६ वर्षीय युवा शेतकरी पुत्राने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवार, २६ सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. मृत युवकाचे नाव आकाश बळीराम पाटील (वय २६) असे आहे.

आकाशचे वडील बळीराम पाटील यांच्याकडे अवघी चार एकर शेती आहे. पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार या शेतीवरच अवलंबून आहे. अल्प उत्पन्नामुळे कुटुंबातील सदस्य इतरांची शेती करून तसेच मजुरी करून संसाराचा गाडा चालवत होते.

बळीराम पाटील यांनी २०१९-२० मध्ये भारतीय स्टेट बँकेकडून कृषी कर्ज घेतले होते. मात्र उत्पन्न घटत गेले आणि कर्जावरील व्याज वाढत राहिले. शासनाच्या कर्जमाफीच्या याद्या जाहीर झाल्या; मात्र पाटील यांचे नाव एकाही यादीत आले नसल्याचे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले.

यंदा आकाशने विठ्ठल गायकवाड यांची सुमारे १० एकर शेती ठोक्याने करून सोयाबीन आणि तुरीची लागवड केली होती. नांगरणी, वखरणी, बियाणे, खते आणि इतर कामांवर जवळपास अडीच लाख रुपये खर्च झाला. जुलैतील पावसानंतर पीक जोमात होते; मात्र ऑगस्ट-सप्टेंबरमधील दीर्घ पावसाच्या खंडाने संपूर्ण गणित बिघडवले. एकरी ८ ते १० क्विंटल सोयाबीनची अपेक्षा असताना अत्यल्प उत्पादनाची परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे.

शनिवारी सकाळी आकाश घराबाहेर पडला. काही वेळाने शेत परिसरात तो मृतावस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.साखरखेर्डा पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेहकर ग्रामीण रुग्णालयात पाठविला. पुढील तपास ठाणेदार युवराज रबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल निवृत्ती पोफळे करीत आहेत

 

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!