बुलढाणा (हॅलो बुलढाणा) राज्यातील २६५ तालुक्यांत कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची घोषणा होताच शेतकरी नेते तथा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी सरकारच्या उपाययोजनांवर तीव्र टीका केली आहे. “केवळ दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांच्या जखमेवर फुंकर बसणार नाही; हेक्टरी एक लाख रुपये थेट नुकसानभरपाई द्या,” अशी मागणी करत त्यांनी २८ सप्टेंबर रोजी राज्यव्यापी हल्लाबोल आंदोलनाची घोषणा केली.
तुपकर यांच्या म्हणण्यानुसार, परीक्षा फी माफी, शेतसारा माफी, कर्जवसुली स्थगिती, कर्जाचे पुनर्गठन किंवा वीजबिल स्थगिती या उपायांनी शेतकऱ्यांच्या हातात प्रत्यक्ष पैसा येणार नाही. “सोयाबीनसह खरीप पिकांवर शेतकऱ्याने एकरी हजारो रुपये खर्च केले; पीक हातातून गेले असताना चार-पाचशे रुपयांची फी माफ करून काय साध्य होणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
तुपकरांनी दोन हेक्टरची मर्यादा रद्द करून संपूर्ण बाधित क्षेत्राला हेक्टरी एक लाख रुपये मदत, नियमित कर्जफेड करणाऱ्यांना प्रोत्साहन अनुदान, कर्जमाफीतील त्रुटी दूर करणे आणि सर्व पात्र शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज देण्याची मागणी केली आहे.
पंचनाम्यांवरही त्यांनी आक्षेप घेत, “सरसकट नुकसान झाले असताना आता दौरे, फोटोसेशन आणि रिल्स नकोत; शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदत जमा करा,” अशी भूमिका मांडली.
२८ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांची धडक होणार असल्याचे संघटनेने जाहीर केले आहे. दुष्काळाच्या घोषणेनंतर आता मदतीच्या रकमेकडे आणि या आंदोलनाकडे राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे











Total Users : 3513894