बुलढाणा/ उदयनगर (हॅलो बुलढाणा) जिल्ह्यात बिबट्यांची दहशत वाढली असून,बिबट्यांच्या हल्ल्यात वाढ होत आहे.
अमडापूर येथील शेतशिवारात गवत कापत असलेल्या शेतमजुरावर बिबट्याने अचानक हल्ला केल्याची घटना
समोर आली आहे.या हल्ल्यात शेतमजूर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी प्रथम अमडापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी बुलढाणा येथे हलविण्यात आले.
अमडापूर येथील भाग क्रमांक २ मधील गॅस एजन्सी परिसरातील शेतशिवारात अक्षय आदबाने यांच्या शेतात शेतमजूर शेख रशीद शेख फकीर मोहम्मद हे गवत कापण्याचे काम करीत होते. यावेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. जखमी अवस्थेतील शेख रशीद यांना गावकऱ्यांनी तत्काळ अमडापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी बुलढाणा येथे हलविण्यात आले.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी बुलढाणा येथील रुग्णालयात जाऊन जखमी शेतमजुराची भेट घेतली व त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच त्यांनी सिव्हिल सर्जन यांच्याशी चर्चा केली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांशीही चर्चा करून घटनेचा पंचनामा करण्यात यावा, पुढील आवश्यक कार्यवाही करावी तसेच जखमी व्यक्तीला शासकीय मदत मिळावी, अशी मागणी केली.या घटनेनंतर अमडापूर परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये बिबट्याच्या वावरामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वन विभागाने परिसरात पाहणी करून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.











Total Users : 3513806