जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा/ज्ञानदेव राजनकर) जामोद परिसरातील शेतकरी, शेतमजूर, महिला बचत गट आणि पेन्शनधारकांच्या आर्थिक व्यवहारांवर गदा आणणारा निर्णय प्रशासनाने मागे घ्यावा आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा जामोदशी असलेले कृषी व इतर आर्थिक व्यवहार पूर्वीप्रमाणे कायम ठेवावेत, अशी जोरदार मागणी आता गावकऱ्यांनी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
सुमारे 25 हजार लोकवस्तीच्या जामोदला गेल्या 35 वर्षांपासून महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा आधार आहे. परिसर आदिवासीबहुल असून शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. कृषी कर्ज, व्यवसाय कर्ज, बचत गटांचे व्यवहार, श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार योजना तसेच विविध शासकीय योजनांसाठी हजारो नागरिक या शाखेवर अवलंबून आहेत.
मात्र, खेल शिवापूर जामोद, खेल लोण जामोद, खेल माळी जामोद व खेल पारस्कर जामोद येथील कृषी कर्जधारकांचे व्यवहार जळगाव जामोद येथील एसबीआय कृषी शाखेकडे वळवण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे. आता शेतकऱ्यांना सुमारे 12 किलोमीटरचा फेरा मारावा लागणार आहे.गावकऱ्यांनी थेट सवाल केला आहे.25 किलोमीटरवरील भेडवड खुर्दसारखी गावे जामोद शाखेशी जोडता येतात, मग जामोद परिसरातील शेतकऱ्यांना दुसऱ्या बँकेत का ढकलले जाते?
यासंदर्भात उपविभागीय अधिकारी, एलडीएम, एडीआर आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. सरपंच गंगुबाई दामधर यांच्यासह समाधान दामधर, रमेश धुर्डे, भास्कर हिस्सल, गणेश धर्म, गजानन ढगे, अमोल भगत, सुभाष ढगे, प्रतिक ढगे, पांडुरंग राऊत आदी उपस्थित होते बँक जामोदची… व्यवहार जळगावचे का? असा सवाल करत नागरिकांनी निर्णय बदलला नाही तर आंदोलनाचा इशारा दिला आहे.












Total Users : 3478656