सिंदखेड राजा (हॅलो बुलढाणा) स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून पुण्यातील एका ठेकेदाराला तब्बल ७ लाख ९५ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार सिंदखेड राजा येथे समोर आला आहे. आधी सोन्याचे अस्सल तुकडे देऊन विश्वास संपादन केला आणि नंतर नकली सोन्याच्या गिन्या हातात टेकवत रोकड घेऊन टोळी पसार झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
भोसरी, पुणे येथील ठेकेदार साईनाथ तिपा धोत्रे यांच्या तक्रारीनुसार, दोन महिन्यांपूर्वी कामाच्या ठिकाणी त्यांची अनिल आधार मोहिते, रा. नागपूर याच्याशी ओळख झाली होती. २५ ऑगस्ट रोजी अनिलने आपल्या मित्राला सोने सापडल्याचे सांगत ते खरेदी करण्याची ऑफर दिली. सुरुवातीला धोत्रे यांनी नकार दिला; मात्र वारंवार विश्वास दिल्यामुळे ते तयार झाले.
३१ ऑगस्ट रोजी धोत्रे यांनी अनिलच्या यूपीआय आयडीवर पाच हजार रुपये पाठवले. त्यानंतर सिंदखेड राजा येथे आले असता अनिल व त्याच्या साथीदाराने सोन्याचे काही तुकडे दिले. पुण्यातील सोनाराकडून तपासणी केली असता ते तुकडे खरे असल्याचे सांगण्यात आले. यामुळे धोत्रे यांचा पूर्ण विश्वास बसला.
५ सप्टेंबरला अनिलने मोठा व्यवहार करण्यासाठी त्यांना पुन्हा सिंदखेड राजा येथे बोलावले. ६ सप्टेंबर रोजी धोत्रे पत्नीसमवेत आठ लाख रुपये घेऊन बसस्थानकावर पोहोचले. तेथे अनिल आणि त्याच्या दोन साथीदारांनी सोन्याची पोटली देत ७ लाख ९५ हजार रुपये घेतल्याचा आरोप आहे.
व्यवहारानंतर “तुमच्या मागे लोक लागले आहेत, ताबडतोब निघा,” असा फोन आल्याने दाम्पत्य घाईघाईने बसमध्ये बसले. जालना येथे पोटली तपासल्यानंतर संशय आला. पुण्यात खात्री केली असता गिन्या नकली निघाल्या आणि ‘सोन्याचा सौदा’ फसवणुकीचा सापळा ठरला!
सिंदखेड राजा पोलिसांनी अनिल मोहिते व त्याच्या दोन अज्ञात साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक भरत चापाईतकर करीत आहेत.












Total Users : 3439523