spot_img
spot_img

पेट्रोल पंपाच्या आड ‘बायोडिझेल’चा काळाबाजार? राज्य दक्षता पथकाचा सर्जिकल स्ट्राईक; २१ लाख ६९ हजारांचा मुद्देमाल जप्त!दुसरबीडसह मेहकरमध्ये एकाचवेळी धाड; ट्रक, भूमिगत टाक्या, डिस्पेन्सर अन् इंधनसाठा ताब्यात

सिंदखेडराजा (हॅलो बुलढाणा/वसीम शेख) अवैध बायोडिझेलच्या काळ्या धंद्याविरोधात अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाने थेट ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला आहे. दुसरबीड आणि मेहकर येथील दोन ठिकाणी धडक छापे टाकून बायोडिझेलसदृश पेट्रोलियम पदार्थासह तब्बल २१ लाख ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे अवैध इंधन विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

गुप्त माहितीच्या आधारे पथकाने मेहकर येथील वृंदावन लॉन्सजवळ, हॉटेल बंजारासमोरील छत्रपती शिवाजी महाराज बायपास रस्त्यालगतच्या मोकळ्या जागेवर तसेच सिंदखेडराजा तालुक्यातील दुसरबीड येथे हॉटेल गावकरी फॅमिली रेस्टॉरंटसमोरील कथित अवैध बायोडिझेल पंपावर छापा टाकला.

नियंत्रक शिधावाटप तथा राज्यस्तरीय दक्षता पथकाचे प्रमुख चंद्रकांत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कारवाईत अशोक लेलँड कंपनीचा मालवाहू ट्रक, भूमिगत लोखंडी टाक्या, डिस्पेन्सर युनिट, पाईप आणि बायोडिझेलसदृश द्रवपदार्थाचा साठा जप्त करण्यात आला.

हा इंधनसाठा नेमका कुठून आणला? त्याची वाहतूक कोण करत होते? या काळ्या धंद्याची सूत्रे कुणाच्या हातात आहेत? याचा छडा लावण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून स्थानिक पोलीस आणि पुरवठा विभागाकडून पुढील तपास करण्यात येत आहे.

या धडक कारवाईत गणेश बेल्लाळे, प्रदीप काळे, नागनाथ हंगरगे यांच्यासह राज्य दक्षता व पुरवठा विभागातील अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले होते. अवैध इंधन आणि गॅस तस्करांची यापुढेही गय केली जाणार नाही, असा कडक इशारा चंद्रकांत डांगे यांनी दिला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!