spot_img
spot_img

रात्री ९.३० वाजता हातात तलवार घेऊन तो सातगाव भुसारीत काय करत होता? रायपूर पोलिसांची धडक एन्ट्री अन् जागेवरच ‘गेम ओव्हर’!

रायपूर (हॅलो बुलढाणा/सचिन जैस्वाल) आगामी सार्वजनिक उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्यांविरुद्ध रायपूर पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. सार्वजनिक ठिकाणी अवैधरित्या तलवार बाळगून परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीच्या रायपूर पोलिसांनी जागेवरच मुसक्या आवळल्या. या कारवाईमुळे ग्राम सातगाव भुसारी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, सोमवार, दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे ९.३० वाजताच्या सुमारास रायपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नियमित गस्त घालत होते. यावेळी ग्राम सातगाव भुसारी येथे एक व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी तलवार घेऊन फिरत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

पोलिसांनी कोणताही अनुचित प्रकार घडण्यापूर्वीच तत्काळ हालचाल करत संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याचे नाव नितीन दिगंबर डुकरे, रा. सावरगाव डुकरे, ता. चिखली, जि. बुलढाणा असे निष्पन्न झाले. त्याच्याकडे आढळलेली तलवार पोलिसांनी जप्त केली आहे.

याप्रकरणी नितीन डुकरे याच्याविरुद्ध रायपूर पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रायपूर पोलीस करीत आहेत.

ही कारवाई ठाणेदार निलेश सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार दिलीप पडघान, पोलीस हेड कॉन्स्टेबल आशिष काकडे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल जाधव, अनंत कळमकर आणि चालक पोलीस हवालदार लिंबाजी राठोड यांच्या पथकाने केली.

दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी अवैध शस्त्रांचे प्रदर्शन करून दहशत पसरविणाऱ्यांची आता गय केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या धडक कारवाईतून रायपूर पोलिसांनी दिला आहे. आगामी उत्सव काळात संशयित हालचाली आणि कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!