देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा/संतोष जाधव) नागपूर-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावरील धोत्रा नंदई गावात हजारो वर्षांच्या प्राचीन वैभवाची साक्ष देणारे शंभू महादेवाचे हेमाडपंथी मंदिर आजही दिमाखात उभे आहे. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी ‘ॐ नमः शिवाय’च्या जयघोषाने परिसर दुमदुमतो. मात्र, ऐतिहासिक आणि पुरातत्त्वीय महत्त्व असलेल्या या मंदिराच्या संवर्धनाकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने भाविकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
सतराव्या शतकातील असल्याचे सांगितल्या जाणाऱ्या या मंदिराच्या बांधकामासाठी भव्य दगडांचा वापर करण्यात आला आहे. मंदिरावरील आकर्षक कोरीव आणि नक्षीदार काम तत्कालीन स्थापत्यकलेची साक्ष देते. मंदिराला एकच प्रवेशद्वार असल्यामुळे गाभाऱ्यात कायम अंधार असतो. दीपसमईच्या प्रकाशात भाविक शंभू महादेवाच्या पिंडीवर बेलपत्र, फुले, नारळ आणि गुलाल अर्पण करून भक्तिभावाने आराधना करतात.
श्रावण महिन्यात गावकऱ्यांच्या वतीने कीर्तन, भजन, फराळ, भोजन, भंडारे आणि विविध आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. महिन्याची सांगता महाप्रसादाने होते. नवसाला पावणारे दैवत म्हणून शंभू महादेवाची ख्याती असल्याने महिलांसह दूरदूरचे भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. महाशिवरात्रीलाही येथे भव्य यात्रा भरते.
गावात आणखी दोन अपूर्णावस्थेतील प्राचीन मंदिरे असून त्यांच्या शेजारी पाण्याची मोठी बारव आहे. या ऐतिहासिक वारशाची योग्य नोंद, दुरुस्ती आणि संवर्धन न झाल्यास मौल्यवान स्थापत्यवैभव नष्ट होण्याची भीती आहे.
नंदा गवळ्याच्या ‘सौदंया’ आणि ‘नौदंया’ नावाच्या दोन मुली अचानक अदृश्य झाल्याने गावाला ‘धोत्रा नंदई’ नाव पडल्याची आख्यायिकाही प्रचलित आहे. हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिराकडे पुरातत्त्व विभाग आता तरी लक्ष देणार का, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.











Total Users : 3409738