बुलढाणा (हॅलो बुलढाणा) देश असो की विदेश… नैसर्गिक आपत्तीच्या काळात मदतीचा हात पुढे करण्यात सदैव अग्रेसर असलेल्या ‘बुलडाणा अर्बन परिवाराने’ पुन्हा एकदा माणुसकीचा बुलंद आदर्श उभा केला आहे. नेपाळमध्ये आलेल्या महाभयंकर पुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या नागरिकांच्या मदतीसाठी बुलडाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटीचे पाच डॉक्टरांचे विशेष वैद्यकीय पथक अत्यावश्यक औषधांच्या मोठ्या साठ्यासह नेपाळकडे रवाना झाले आहे.
महापुरामुळे नेपाळमधील अनेक रस्ते आणि पूल वाहून गेल्याने दळणवळण व्यवस्था विस्कळीत झाली आहे. हजारो नागरिकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त असून लाखो नागरिक बेघर झाले आहेत. विशेषतः दुर्गम भागांत वैद्यकीय सुविधांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून साथीचे आजार पसरण्याचा धोकाही वाढला आहे.
ही भयावह परिस्थिती लक्षात घेत बुलडाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष तथा सहकारमहर्षी राधेश्याम चांडक आणि अध्यक्ष डॉ. सुकेश झंवर यांनी तातडीने पुढाकार घेत वैद्यकीय पथक पाठवण्याचा निर्णय घेतला. हे पथक महापुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या कोसी, बागमती आणि गंडकी प्रांतांतील नागरिकांपर्यंत पोहोचून मोफत वैद्यकीय तपासणी, उपचार आणि औषधांचे वाटप करणार आहे.
डॉ. संजय महाजन यांच्या नेतृत्वाखालील हे पथक पुढील आठवडाभर दुर्गम भागांत सेवाकार्य करणार आहे. भारतातून नेपाळच्या पूरग्रस्तांसाठी जाणारे अशा प्रकारचे हे पहिले स्वतंत्र वैद्यकीय पथक असल्याचे सांगण्यात येत आहे.
या मोहिमेसाठी नेपाळ सरकारच्या गृह आणि आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी मार्गदर्शन व सहकार्य करणार आहेत. संकटाच्या काळात केवळ सहानुभूती व्यक्त न करता थेट मदतीसाठी धावून जाणाऱ्या ‘बुलडाणा अर्बन’च्या या सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र जोरदार कौतुक होत आहे.











Total Users : 3408141