शेगाव (हॅलो बुलढाणा) अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाचे माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांच्या वाहनाचा नुकताच शेगाव तालुक्यातील खेरडा गावाजवळ अत्यंत भीषण अपघात झाला. जलंब येथून शेगावकडे जात असताना अचानक एक रोही वाहनासमोर आल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. अनियंत्रित झालेले वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन सुमारे २० ते २५ फूट खाली पलटी झाले.
अपघाताच्या वेळी वाहनात माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांच्यासह त्यांचे स्वीय सहाय्यक, एक शिक्षक आणि वाहनचालक असे चौघेजण होते. अपघाताचे स्वरूप अत्यंत भीषण होते; मात्र सुदैवाने वाहनातील कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली असून, सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
विशेष म्हणजे, कालच श्रीकांत देशपांडे यांनी बुलढाणा येथे पत्रकार परिषद घेतली होती. आगामी शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचे बुलढाणा विभागात दौरे सुरू आहेत. याच दौऱ्यादरम्यान हा थरारक अपघात घडला.
अपघाताची माहिती मिळताच त्या मार्गाने जाणारे मोताळा तालुक्यातील जागरूक नागरिक पिंटू पाटील (शिंब्रे), रा. परडा आणि बळीराम वनारे, रा. टाकळी शेगाव यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी माणुसकीचे दर्शन घडवत माजी आमदार देशपांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना वाहनातून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी मदत केली. त्यांच्या प्रसंगावधानामुळे अपघातग्रस्तांना तातडीचा आधार मिळाला.












Total Users : 3400587