spot_img
spot_img

‘आमदाराच्या भरोशावर माजले का?’ ठाण्यात दमबाजी… बंद दाराआड मारहाण? खाकीवर खळबळजनक आरोप!‘कपडे उतरवले, फोटो काढले अन् व्हायरल करण्याची धमकी दिली!’ प्रशांत मुंढेंच्या निवेदनातून गंभीर आरोप; किनगाव राजा ठाणेदार मातोंडकरांसह संबंधितांवर गुन्हा दाखल करून निलंबनाची मागणी!

सिंदखेडराजा (हॅलो बुलढाणा) न्याय मागण्यासाठी नागरिकांनी जायचे कुठे, पोलीस ठाण्यातच अपमान आणि मारहाण होत असेल तर? उमरद येथील प्रशांत मुंढे यांच्या निवेदनाने हा गंभीर सवाल उपस्थित केला आहे. किनगाव राजा पोलीस ठाण्याचे ठाणेदार संजय मातोंडकर व संबंधित कर्मचाऱ्यांनी चौघांचे कपडे उतरवून मारहाण केली, फोटो काढले आणि बदनामीची धमकी दिल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्याकडे संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करून तात्काळ निलंबनाची मागणी करण्यात आली आहे.

 

निवेदनानुसार, २८ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी सातच्या सुमारास प्रशांत मुंढे, योगेश मुंडे, गणेश बोडखे आणि शुभम घुगे यांना पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले. तक्रारीची माहिती न देता मोबाईल काढून घेत अश्लील शिवीगाळ केल्याचे अर्जदाराचे म्हणणे आहे. वंजारी समाजाचा उल्लेख करून अपमानास्पद बोलण्यात आले, तसेच आमदारांशी असलेल्या संबंधांवरून धमकावल्याचाही आरोप आहे.

यानंतर चौघांना एका खोलीत नेऊन कपडे उतरविण्यास भाग पाडले. दरवाजा बंद करून चापटाबुक्क्यांनी मारहाण केली आणि बुटांनी पाय रगडल्याचा दावा निवेदनात आहे. पोलीस कर्मचारी गणेश वारकरी यांनी मोबाईलमध्ये विवस्त्र अवस्थेतील फोटो काढून गावातील ग्रुपवर प्रसारित करण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

‘याबाबत कोणाला सांगितल्यास सरपंच, ग्रामसेवक व इतरांकडून तक्रारी घेऊन अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करू,’ असे धमकावल्याचे निवेदनात म्हटले आहे. दोन ते तीन तास बेकायदेशीरपणे डांबून ठेवल्यानंतर सोडल्याचा अर्जदाराचा दावा आहे.

घटनेच्या वेळचे सीसीटीव्ही फुटेज तपासून इतर पुरावे गोळा करावेत आणि तपासात हस्तक्षेप टाळण्यासाठी संबंधितांची बदली करावी, अशीही मागणी आहे. कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन आणि न्यायालयात दाद मागण्याचा इशारा देण्यात आला आहे.

आता या गंभीर आरोपांची निष्पक्ष चौकशी होणार का? सीसीटीव्हीतून वस्तुस्थिती समोर येणार का? तक्रारदारांना न्याय आणि संबंधितांना बाजू मांडण्याची संधी देणारी पारदर्शक चौकशी आवश्यक आहे. पोलीस अधीक्षकांकडून या निवेदनावर कोणती कारवाई होते, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!