चिखली (हॅलो बुलढाणा/ सय्यद साहिल) राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब यांचे माहेर,विदर्भाचे प्रवेशद्वार, जगविख्यात लोणार सरोवर म्हणून सुप्रसिद्ध असा आमचा बुलढाणा जिल्हा.
जिल्ह्यातील चिखली तालुका हा महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच केंद्रस्थानी असलेला.
ज्यामुळे जिल्ह्यातील संघ, संघटना व पक्षाचे प्रमुख पद बहुदा तालुक्यातच मिळालेले असल्याने राजकारणात स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी प्रत्येक तरूण धडपडतांना दिसत आहे.
वेगवेगळ्या पक्ष, संघटनेत आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठी तरुणपिढी आपले आयुष्य पणाला लावून बसतात.
राजकारणाकडे दुर्लक्ष नको पण राजकारण हेच आपले करिअर समजून त्याच्या मागे धावणे हे चुकीचे आहे. गावातील एक कार्यकर्ता आपले करिअर घडविण्यासाठी आपल्याच जवळच्या युवा पिढीला राजकारणाची वाट दाखवतो.
ज्या वयात शिक्षण महत्वाचे असते त्याच किशोरवयात काही कार्यकर्ते या युवापिढीला जात धर्म पक्ष व राजकारण या विषयात गुंतवून ठेवतात.
राजकारणाची खालावलेली पातळी पाहता तरुणांच्या मनात राग, द्वेष, मत्सर घर करून बसले आहे.
सुशिक्षित तरुणांनी आता आपली मानसिकता बदलणे गरजेचे आहे, आज मुलांना शैक्षणीक क्षेत्रात प्रबोधनाची नितांत आवश्यकता असल्याने सुज्ञ नागरिक व पालकांनी आपल्या पाल्यावर अनुभवाचे डोस पाजणे गरजेचे झाले आहे.
प्राथमिक, माध्यमिक शिक्षणानंतर महाविद्यालयीन शिक्षणात प्रवेश घेतल्यावर मुलांना आज मार्गदर्शनाची व त्यांच्या आवडीनुसार शैक्षणीक क्षेत्र निवडण्यासाठी समाजात बदल घडविण्यासाठी तज्ञ मार्गदर्शक प्रवक्त्यांची गरज आहे.
आमचा बुलढाणा जिल्हा राजकारणात जसा परिचित आहे त्याच प्रमाणे आमच्या बुलढाणा जिल्ह्यातील विद्यार्थी पण हुशार आहेत.
ग्रामीण व शहरी भागात योग्य मार्गदर्शन व शैक्षणिक प्लॅटफॉर्म मिळत नसल्याने त्यांच्या अंगी असलेले गुणांची दखल घेतल्या जात नाही.
आज घडीला थोडाफार बदल झाला आहे परंतु वीस वर्ष अगोदर जिल्ह्यात शैक्षणिक सुविधा नसतांनाही आमच्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी IAS, IPS च्या पदव्या घेऊन शेकडो साहेबांनी बुलढाणा जिल्ह्याची मान उंचावली आहे.
त्यातूनच एक असे आमच्या तालुक्यातील सुप्रसिद्ध असे अधिकारी ज्यांना जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रातील प्रत्येक कानाकोपऱ्यात ओळखल्या जाते असे श्री विद्याधर महाले साहेब यांनी शिक्षणाचे महत्व प्रत्यक्षात दाखवून दिले आहे.
आजरोजी महाराष्ट्र राज्याच्या मंत्रालयात माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे खाजगी सचिव (पर्सनल सेक्रेटरी) म्हणून महाराष्ट्रभर झळकले आहेत.
यशाच्या या उच्च शिखरावर पोहचण्यासाठी साहेबांना जो संघर्ष करावा लागला तो शब्दात सांगणे कठीण असले तरी मार्ग एकच होता तो म्हणजे शिक्षण.
शिक्षण हाच एकमेव मार्ग होता जो त्यांना या उच्च शिखरावर पोहचवू शकत होता आणि त्यांनी त्याच मार्गावर चालून आपले लक्ष साध्य केले.
खडतर प्रवासात शेकडो अडचणी आल्या असतील
आज कष्टाचे सार्थक झालेच.
आमच्या जिल्ह्यात असे नावलौकिक मिळविणारे आणखी अधिकारी आहेत ज्यांचा आदर्श घेऊन विद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे धाव घेणे काळाची गरज आहे.
दुर्भाग्य असे की युवा वर्ग शिक्षणाकडे दुर्लक्ष करून जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्राम पंचायत, कृषी उत्पन्न बाजार समिती, शासकीय समित्या यांचे नामधारी पद मिळविण्यात व्यस्त झालेले आहे.
चिखली तालुक्यातील तोरणवाडा हे एक छोटंसं गाव त्या काळात गावात आजच्या सारख्या शैक्षणीक व वाहतुकीच्या सुविधा नसतांनाही शिक्षणाची आवड असल्याने जिद्द, चिकाटी व स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी विद्याधराने विद्येचे सागर बनुन आपले लक्ष साध्य केलेच.
खरं तर आजच्या पिढीने राजकारण्यांचा आदर्श न घेता अधिकाऱ्यांच्या अदर्शावर चालण्यासाठी शिक्षणाची कास धरली पाहिजे.
शिक्षणातून तुमच्यासाठी असंख्य वाटा मोकळ्या झालेल्या आहेत राजकारणातील पाच वर्षासाठी मिळणारे फुकटचे, नाममात्र, पद घेऊन बिन पगारी फुल अधिकारी झाल्या पेक्षा श्री विद्याधर महाले साहेब सारखे अधिकारी व्हा, आवश्यक नाही सगळेच अधिकारी होतील वेगवेगळ्या क्षेत्रात खूप जागा उपलब्ध आहेत, तुमची शिक्षणातील आवड, जिद्द, चिकाटी तुम्हाला अधिकारी, डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक, पोलीस, तलाठी, बनवू शकते.
अधिकारी नाहीच झाले तर चपराशी व्हा शेतात काम करा उद्योग धंद्यात या पण राजकारणाच्या दलदलीत फसू नका.
आज चिखली तालुक्यातच नव्हे तर महाराष्ट्रात ओळखल्या जाणारे सुशिक्षितांना आदर्शवत असलेले, श्री विद्याधर महाले साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.
मुख्तार शेख…✍️
7057911311













Total Users : 3373195