spot_img
spot_img

EXCLUSIVE बॅनरवर सारेच… पण ‘गॉडफादर’ गायब! शेगाव काँग्रेसमध्ये पुन्हा गटबाजीचा धूर?प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या वाढदिवसाच्या फलकांवर मुकुल वासनिकांना डच्चू; जिल्हा काँग्रेसला त्यांच्या योगदानाचा विसर पडला का?

शेगाव (हॅलो बुलढाणा) काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त शेगाव शहरात झळकलेल्या शुभेच्छा फलकांनी काँग्रेसमधील कथित गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर आणली आहे. फलकांवर पक्षातील विविध राज्यस्तरीय आणि स्थानिक नेत्यांची छायाचित्रे असताना माजी केंद्रीय मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याच्या राजकारणातील प्रभावशाली नेते खासदार मुकुल वासनिक यांचा फोटो मात्र गायब असल्याने काँग्रेसच्या वर्तुळात जोरदार कुजबुज सुरू झाली आहे.

मुकुल वासनिक आणि बुलढाणा जिल्हा काँग्रेस हे अनेक दशकांपासून एकमेकांपासून वेगळे करता न येणारे राजकीय समीकरण मानले जाते. विशेषतः शेगावमधील अनेक जुने कार्यकर्ते, पदाधिकारी आणि काँग्रेसशी जोडलेल्या कुटुंबांशी वासनिक यांचे राजकीयच नव्हे, तर घरगुती ऋणानुबंध आहेत. जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणी, कार्यकर्त्यांना विविध जबाबदाऱ्या आणि प्रतिनिधित्वाची संधी देण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिल्याचे काँग्रेसचे कार्यकर्ते सांगतात.

अशा परिस्थितीत प्रदेशाध्यक्षांच्या वाढदिवसाच्या बॅनरवरून वासनिकांचा फोटो गायब होणे हा निव्वळ योगायोग आहे की जाणीवपूर्वक दिलेला राजकीय संदेश, असा सवाल उपस्थित होत आहे. सपकाळ समर्थकांकडून शहरभर मोठे होर्डिंग्ज आणि कटआऊट लावत शक्तिप्रदर्शन करण्यात आले; मात्र जिल्हा काँग्रेसचे दीर्घकाळ नेतृत्व करणाऱ्या वासनिकांना फलकावर स्थान न मिळाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

प्रदेशाध्यक्षपदाची धुरा हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे आल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलत आहेत का? वासनिक समर्थकांना बाजूला सारण्याचा प्रयत्न सुरू आहे का? की हा केवळ फलक लावणाऱ्यांचा दुर्लक्षपणा आहे?

‘वासनिकांशिवाय बुलढाणा काँग्रेसचा फलक कसा?’हा प्रश्न आता शेगावच्या राजकीय वर्तुळात घुमत असून, काँग्रेसमधील अंतर्गत मतभेदांची ही नवी ठिणगी तर नाही ना, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!