डोणगाव (हॅलो बुलढाणा/अनिल राठोड) मुलगा जन्माला आला तर जल्लोष आणि मुलगी झाली तर नाराजी समाजातील या जुनाट मानसिकतेला डोणगाव येथील धोंगडे कुटुंबाने आपल्या कृतीतून जोरदार चपराक दिली आहे! घरात जन्मलेल्या लाडक्या नातीचे ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी, फुलांची उधळण आणि पेढ्यांचे वाटप करत एखाद्या राजकन्येप्रमाणे जंगी स्वागत करण्यात आले. या आगळ्यावेगळ्या सोहळ्याने संपूर्ण डोणगावचे लक्ष वेधून घेतले.
डोणगाव येथील शेतीनिष्ठ शेतकरी तथा ‘चिंतामणी फार्म हाऊस’ आणि ‘चिंतामणी डेअरी’चे संचालक राजूभाऊ धोंगडे यांच्या घरी लाडक्या नातीचे आगमन झाले. चिमुकली पहिल्यांदाच घरी येणार असल्याची माहिती मिळताच धोंगडे कुटुंबाने तिच्या स्वागताची जय्यत तयारी केली. घरापासून तब्बल एक किलोमीटर अंतरावरून चिमुकलीची भव्य मिरवणूक काढण्यात आली.
ढोल-ताशांच्या तालावर नातेवाईक आणि परिसरातील महिलांनी आनंदोत्सव साजरा केला. संपूर्ण रस्त्यावर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. फटाक्यांच्या आतषबाजीत आणि फुलांच्या वर्षावात चिमुकलीचे पारंपरिक पद्धतीने औक्षण करून थाटामाटात गृहप्रवेश करण्यात आला. यावेळी परिसरात पेढे वाटून आनंद द्विगुणित करण्यात आला.
“मुलगी किंवा नात ही घरची खरी लक्ष्मी असते. तिच्या पावलांनी आमच्या घरात खऱ्या अर्थाने आनंद आणि समृद्धी आली,” अशी भावनिक प्रतिक्रिया आजोबा राजूभाऊ धोंगडे यांनी व्यक्त केली.
मुलीच्या जन्माचे इतक्या शाही थाटात स्वागत करून धोंगडे कुटुंबाने ‘लेक वाचवा, लेक शिकवा आणि लेकीचा सन्मान करा’ हा संदेश केवळ शब्दांतून नव्हे, तर कृतीतून दिला आहे. या प्रेरणादायी सोहळ्याची सध्या डोणगावसह परिसरात जोरदार चर्चा होत असून, धोंगडे कुटुंबावर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.











Total Users : 3352150