देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा/संतोष जाधव) तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्यासह महसूल पथकावरील कथित जीवघेण्या हल्ल्याचे वृत्त ‘हॅलो बुलढाणा’ने आक्रमकपणे प्रसारित केल्यानंतर अवैध रेती वाहतुकीविरोधात पोलिसांचा कारवाईचा बुलडोझर सुरू झाला आहे. बुलढाण्याचे कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अंढेरा पोलिसांनी अवैध रेती वाहून नेणारे दोन टिप्पर पकडून संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल केले. रेतीमाफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी खाकीने उचललेले हे पाऊल निश्चितच कौतुकास्पद ठरत आहे.
२५ ऑगस्ट रोजी सकाळी पोलीस उपनिरीक्षक दिनेश घुगे, पोलीस कॉन्स्टेबल नितीन फुसे आणि अमोल रोरे हे पेट्रोलिंग करीत असताना वाकी बुद्रुक फाट्यावर देऊळगाव महीच्या दिशेने येणाऱ्या दोन पांढऱ्या टिप्परवर त्यांची नजर पडली. पोलिसांनी दोन्ही वाहने थांबवून तपासणी केली असता प्रत्येकी चार ब्रास अशी एकूण आठ ब्रास अवैध रेती आढळून आली. या रेतीची एकूण अंदाजित किंमत ४८ हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
पहिल्या कारवाईत MH-28-CF-8952 क्रमांकाच्या टिप्परमध्ये चार ब्रास रेती आढळली. टिप्परचालक तथा मालक सतीश चिंधाजी सरोदे (वय ३५, रा. नागणगाव, ता. देऊळगाव राजा) याच्याकडे रॉयल्टी अथवा वाहतूक परवाना नसल्याचे तपासात समोर आले. दुसऱ्या कारवाईत
MH-13-DQ-5278 क्रमांकाच्या टिप्परमध्येही चार ब्रास अवैध रेती मिळाली. चालक नितीन संजन इंगळे (वय २९, रा. भानखेड, ता. चिखली) आणि संबंधित टिप्परमालकाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली.
दोन्ही प्रकरणांत भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या कलम ४८(७) आणि ४८(८) अन्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे, तहसीलदारांवरील कथित हल्ल्याच्या निषेधार्थ पटवारी संवर्गाचे काम बंद आंदोलन सुरू असतानाच पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे रेतीमाफियांमध्ये खळबळ उडाली आहे. मात्र ही कारवाई स्वतंत्र अवैध रेती वाहतूक प्रकरणांतील असून तहसीलदारांवरील हल्ल्यातील आरोपींविरुद्धही निर्णायक कारवाईची अपेक्षा कायम आहे.
कर्तव्यदक्ष एसपी निलेश तांबे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी दाखविलेली सतर्कता आणि अंढेरा पोलिसांचा धाडसी कारवाईचा वेग अभिनंदनीय आहे. आता अवैध रेतीचा प्रत्येक टिप्पर पोलिसांच्या रडारवर आणून या साखळीच्या मुळाशी असलेल्या बड्या सूत्रधारांपर्यंत खाकीचे हात पोहोचणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे!











Total Users : 3346385