spot_img
spot_img

संताच्या फोटोवर स्वतःचा चेहरा लावून सोशल मीडियावर पोस्ट! श्री समर्थ योगीराज गोविंद महाराजांचा अपमान केल्याचा आरोप; मलकापूर ग्रामीण पोलिसांत भाविकांची धाव!

मलकापूर (हॅलो बुलढाणा) लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री समर्थ योगीराज गोविंद महाराज यांच्या छायाचित्रात फेरफार करून त्यावर स्वतःचा चेहरा लावल्याचा गंभीर आरोप अमरावती येथील एका व्यक्तीवर करण्यात आला आहे. या प्रकारामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा दावा करत भाविकांनी मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, प्रकरणाने पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे.

धानोरा येथील योगिता संदीप गावंडे यांनी समस्त भाविकांच्या वतीने दिलेल्या तक्रारीनुसार, श्री समर्थ योगीराज गोविंद महाराज यांचे माखनेर, ता. मलकापूर तसेच अमरावती येथील बडनेरा रोडवर मंदिर असून, महाराजांना मोठ्या प्रमाणात भाविक मानतात.

तक्रारीत नमूद आरोपानुसार, अमरावती येथील घनशाम राजेंद्र ढोले नामक व्यक्तीने महाराजांच्या मूळ छायाचित्रातील चेहरा एडिट करून त्या जागी स्वतःचा चेहरा लावला. हे कथित आक्षेपार्ह फोटो व्हॉट्सॲप, फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर वेळोवेळी प्रसारित करण्यात आल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

संबंधित फोटो १९ फेब्रुवारी, ३१ मार्च, २३ मे आणि २८ जुलै २०२६ रोजी सोशल मीडियावरून पाठविण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या कृत्यामागे श्रद्धास्थानाची हेतुपुरस्सर अवहेलना करण्याचा दुष्ट उद्देश असल्याचा आरोप भाविकांनी केला आहे.

या प्रकारामुळे समस्त भाविकांच्या धार्मिक भावना तीव्रपणे दुखावल्या असून, संबंधित व्यक्तीविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. आता मलकापूर ग्रामीण पोलीस या तक्रारीची चौकशी करून नेमकी कोणती कारवाई करतात, याकडे भाविकांचे लक्ष लागले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!