चिखली (हॅलो बुलढाणा/सय्यद साहिल) ऑनलाइन गुंतवणूक, पार्ट टाइम जॉब, डिजिटल फसवणूक आणि विविध आमिषांच्या माध्यमातून नागरिकांना जाळ्यात ओढणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या आर्थिक साखळीचा धक्कादायक धागा चिखलीपर्यंत पोहोचल्याचे समोर आले आहे. चिखली पोलिसांच्या गोपनीय विभागातील पोलीस कर्मचारी राजेश भिमराव गौड यांनी सरकारतर्फे दिलेल्या तक्रारीनुसार, शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतील एका खात्याचा वापर कथितरित्या ‘म्युल बँक अकाउंट’ म्हणून झाल्याचे तपासात आढळून आले आहे.
महाराष्ट्र सायबर, मुंबई यांच्याकडून प्राप्त मनी ट्रेल, म्युल अकाउंट तसेच एटीएम व चेकद्वारे झालेल्या व्यवहारांच्या माहितीचे विश्लेषण करताना हा प्रकार उघडकीस आल्याचे तक्रारीत नमूद आहे. गोपाल टॉकीज रोडवरील काझी ऑईल मिलसमोरील यमुना कॉम्प्लेक्स येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतील संबंधित खात्यात 1 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर 2025 या कालावधीत संशयास्पद आर्थिक व्यवहार झाल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले.
धक्कादायक बाब म्हणजे या खात्याविरुद्ध केंद्र सरकारच्या NCRP अर्थात नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टलवर देशातील विविध राज्यांतून तब्बल 15 तक्रारी नोंद असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पंजाब, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, गुजरात, केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, तामिळनाडू, तेलंगणा आदी राज्यांतील सायबर फसवणुकीच्या प्रकरणांशी या खात्याचे आर्थिक व्यवहार जोडले गेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
प्राथमिक पडताळणीत संबंधित खात्यात संशयास्पदरीत्या रक्कम जमा होऊन ती पुढे इतर खात्यांमध्ये हस्तांतरित झाल्याचे निदर्शनास आले. तक्रारीनुसार, सुमारे 80 हजार रुपयांच्या आर्थिक फसवणुकीशी संबंधित व्यवहारांचा तपास सुरू असून या खात्यामागे नेमके कोण, स्थानिक एजंट कोण आणि देशभर पसरलेल्या सायबर टोळीची साखळी किती मोठी आहे, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.










