बुलढाणा (हॅलो बुलढाणा) तब्बल ₹१६० कोटी रुपयांच्या कथित शालार्थ आयडी महाघोटाळ्याचे धागेदोरे आता थेट बुलढाणा जिल्ह्यापर्यंत पोहोचल्याने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील अटकेतील संशयित आरोपी प्रशांत वाडीले (रा. धुळे) याच्या मोबाइलमधून ५० हून अधिक संस्था, १०० पेक्षा जास्त शिक्षक, तसेच विविध शाळांच्या मान्यता, वेतन मंजुरी आणि शालार्थ आयडीशी संबंधित कागदपत्रे तपास यंत्रणेच्या हाती लागल्याची माहिती समोर आली आहे.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या डिजिटल पुराव्यांमध्ये बुलढाण्यासह बीड, जालना, अकोला, नाशिक आणि अन्य जिल्ह्यांतील शाळा व संस्थांशी संबंधित कागदपत्रांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे ₹१६० कोटींच्या या कथित घोटाळ्यात बुलढाणा जिल्ह्यातील नेमक्या कोणत्या संस्था, शाळा किंवा व्यक्तींचा संबंध आहे, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
तपासात पुढे आलेल्या माहितीनुसार, केवळ बनावट शालार्थ आयडी तयार करण्यापुरतेच हे रॅकेट मर्यादित नव्हते. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या नावाने कथित खोटे आदेश, बनावट मान्यता पत्रे, लेटरहेड, शिक्के आणि सह्यांचा वापर करून संपूर्ण यंत्रणेलाच चकवा देण्याचा मोठा डाव रचण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
प्रशांत वाडीले सध्या नाशिक एसआयटीच्या ताब्यात असून, न्यायालयाने त्याच्या पोलिस कोठडीत आणखी पाच दिवसांची वाढ केली आहे. आता त्याच्या मोबाइलमधील बुलढाण्याशी संबंधित कागदपत्रांची कसून छाननी झाल्यानंतर जिल्ह्यातील किती ‘बडे चेहरे’ समोर येणार? कोणत्या संस्थांनी आर्थिक व्यवहार केले? आणि या कथित ₹१६० कोटींच्या महाघोटाळ्याच्या साखळीत बुलढाण्याची भूमिका नेमकी किती मोठी आहे? हे प्रश्न ऐरणीवर आले आहेत.
‘हॅलो बुलढाणा’ या प्रकरणातील बुलढाणा कनेक्शनवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. तपासाची पुढची कडी उघडताच जिल्ह्यात मोठा राजकीय आणि प्रशासकीय भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही!










