बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शहरातील शाम नगर परिसरात आज, 18 जुलै रोजी सकाळी घडलेल्या धक्कादायक घटनेने एकच खळबळ उडाली. 29 वर्षीय धीरज बबनराव सनगाळे याचा 132 केव्ही विद्युत लाईनच्या उंच टॉवरवरून पडून मृत्यू झाल्याची घटना सकाळी 6 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. मृतक हा सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा असल्याची माहिती आहे.
प्राप्त माहितीनुसार, धीरज सनगाळे हा पहाटे सुमारे 5 वाजता घरातून बाहेर पडला होता. काही वेळानंतर परिसरातील विद्युत टॉवरखाली एक तरुण पडलेला नागरिकांच्या निदर्शनास आला. जवळ जाऊन पाहिल्यानंतर तो धीरज असल्याचे स्पष्ट झाले. त्याला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच बुलढाणा शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार संग्राम पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. धीरजने टॉवरवरून उडी घेऊन आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, एपीआय मल्लिकार्जुन वाघमोडे पुढील तपास करीत आहेत. मृत्यूमागील नेमके कारण पोलीस तपासानंतर स्पष्ट होणार आहे.










