बुलढाणा (हॅलो बुलढाणा/ ज्ञानदेव राजनकर) रविवारचा सुट्टीचा दिवस नांदुरा येथील दोन कुटुंबांसाठी आयुष्यभराची जखम देणारा ठरला. मानेगावजवळील पूर्णा नदीपात्रात आंघोळीसाठी उतरलेल्या तीन मुलांपैकी दोन मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. प्रतीक शिवा वानखडे (वय १२) आणि कृष्णा बाळू भोपळे (वय १४, दोघे रा. वॉर्ड क्रमांक १, नांदुरा) अशी मृत मुलांची नावे आहेत.
पावसामुळे जिल्ह्यातील नद्या दुथडी भरून वाहत असताना रविवारी सकाळी ही तीन मुले मानेगाव येथील पूर्णा नदीपात्रात पोहण्यासाठी उतरली होती. मात्र पाण्याचा वेग, खोली आणि नदीपात्राचा अंदाज न आल्याने प्रतीक आणि कृष्णा खोल पाण्यात बुडाले.दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, जळगाव जामोद पोलीस शवविच्छेदनासह पुढील कायदेशीर प्रक्रिया करीत आहेत.










