किनगाव राजा (हॅलो बुलढाणा/निलेश डिघोळे) हिवरखेड पूर्णा परिसरातून अवैध रेती वाहतुकीचा कथित धंदा भरदिवसा सुरू असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. रेतीने खचाखच भरलेली वाहने किनगाव राजा बसस्थानक मार्गावरून वारंवार धावत असतानाही महसूल विभाग आणि संबंधित यंत्रणा नेमक्या कुठे आहेत, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, रेती वाहतुकीचा हा प्रकार लपूनछपून नव्हे, तर दिवसाढवळ्या सुरू आहे. त्यामुळे या वाहनांकडे प्रशासनाचे लक्ष जात नाही की जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे, याबाबत परिसरात जोरदार चर्चा रंगली आहे. नियम धाब्यावर बसवून रेती वाहतूक होत असेल, तर संबंधित वाहनांवर कारवाई का होत नाही? तपासणी नाके केवळ नावापुरतेच उरले आहेत का? असे प्रश्न नागरिक विचारत आहेत.
अवैध रेती उपसा आणि वाहतुकीमुळे शासनाच्या लाखो रुपयांच्या महसुलाला फटका बसण्याची शक्यता असून, नदीपात्र आणि पर्यावरणाचेही मोठे नुकसान होते. प्रशासनाने तत्काळ विशेष पथक नेमून वाहनांची तपासणी करावी, परवाने पडताळावेत आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा नागरिक आंदोलनाचा मार्ग स्वीकारतील, असा इशारा स्थानिकांकडून देण्यात आला आहे.










