बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील गजबजलेल्या रस्त्यावर अचानक दोन बैल आमनेसामने आले आणि काही क्षणांतच तुफान झुंज सुरू झाली. एकमेकांवर शिंगे रोखून दोघांनीही भररस्त्यात असा धुमाकूळ घातला की नागरिकांची अक्षरशः पळापळ उडाली.
दोन्ही बैलांची झुंज इतकी भयावह होती की रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या काही दुचाकी खाली कोसळल्या, तर हातावर पोट असलेल्या छोट्या दुकानदारांच्या साहित्याचेही नुकसान झाले. बैल कधी रस्त्यावर, तर कधी थेट दुकानांच्या दिशेने धावत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. बघ्यांची गर्दी मात्र क्षणाक्षणाला वाढतच होती.
घटनास्थळी उपस्थित दोन पोलिसांनी बैलांना वेगळे करण्याचा प्रयत्न केला. दांड्यांचा वापर करूनही दोन्ही बैल पोलिसांनाही जुमानत नव्हते. काही वेळ परिस्थिती इतकी गंभीर झाली की आज दोघांपैकी एका बैलाचा जीव जाणार की काय, अशी भीती नागरिकांना वाटू लागली.
अखेर झुंजत-झुंजत दोन्ही बैल जवळच्या मैदानात घुसले. बराच वेळ चाललेल्या या थरारानंतर त्यांची झुंज शांत झाली; मात्र तोपर्यंत दुकानदारांचे नुकसान आणि नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला होता.










