बुलढाणा (हॅलो बुलढाणा) मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील वक्तव्याने राज्यातील राजकारणात मोठा भडका उडाला आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी लोढांवर अक्षरशः तोफ डागत त्यांचे वक्तव्य शेतकऱ्यांचा अपमान करणारे असल्याचा घणाघाती आरोप केला.
“हा देश पूर्वीही कृषिप्रधान होता, आजही कृषिप्रधान आहे आणि भविष्यातही कृषिप्रधानच राहणार आहे. देश स्टार्टअपच्या भरोशावर नव्हे, तर शेतकऱ्यांच्या घामावर मोठा झाला आहे,” असा थेट इशारा तुपकरांनी दिला.
अंबानी-अदानींच्या कारखान्यांमध्ये ज्वारी, बाजरी, सोयाबीन, कापूस पिकवण्याचे तंत्रज्ञान अजून जन्माला आलेले नाही. त्यासाठी आमच्या शेतकऱ्यांच्या वावरातच यावे लागेल, असा जोरदार टोला त्यांनी लगावला.
“लोढांना शेतकऱ्यांबद्दल एवढाच तिटकारा असेल, तर त्यांनी उद्यापासून ताटात शेतकऱ्याने पिकवलेले अन्न घेऊ नये. कारखान्यात तयार झालेले नट-बोल्ट, सिमेंट आणि धातू खावेत,” असा संतप्त हल्लाबोल तुपकरांनी केला.
लोढांनी वक्तव्य तात्काळ मागे घेऊन देशातील तमाम शेतकऱ्यांची माफी मागावी; अन्यथा शेतकऱ्यांना घेऊन मलबार हिलवरील त्यांच्या घरासमोर धडक आंदोलन करू, असा निर्वाणीचा इशाराही तुपकरांनी दिला.










