spot_img
spot_img

म्हाडा की खासगी सावकार? गरीब लाभार्थ्याच्या मानगुटीवर ४५ हजारांच्या व्याजाचा फास!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना हक्काचे घर मिळावे, या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या म्हाडाच्या गृहप्रकल्पातच गरीब लाभार्थ्यांची आर्थिक पिळवणूक सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गृहकर्ज मंजूर होण्यास झालेल्या विलंबाचा कोणताही दोष लाभार्थ्याचा नसताना म्हाडा प्रशासनाने थेट ४५ हजार रुपयांच्या व्याजाचा तगादा लावल्याने संतापाची लाट उसळली आहे.

संबंधित लाभार्थ्याने सदनिकेचा पहिला हप्ता नियोजित वेळेत भरला होता. मात्र विविध बँकांनी गृहकर्ज देण्यास विलंब केल्याने उर्वरित रक्कम भरण्यास सुमारे सहा महिने उशीर झाला. अखेर कर्जाची व्यवस्था करून संपूर्ण रक्कम भरल्यानंतरही म्हाडाने दिलासा देण्याऐवजी विलंबाच्या नावाखाली ४५ हजार रुपये अतिरिक्त व्याज भरण्याची नोटीस दिली.

एकीकडे शासन गरीबांना घर देण्याच्या घोषणा करते, तर दुसरीकडे त्याच गरीब लाभार्थ्यांच्या खिशावर म्हाडा प्रशासन डल्ला मारत असल्याचा आरोप होत आहे. शासकीय संस्था मदतीचा हात देणार की खासगी सावकारासारखी व्याजवसुली करणार, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.

पीडित लाभार्थ्याने जिल्हाधिकारी आणि गृहनिर्माण मंत्र्यांकडे तक्रार करून अन्यायकारक व्याज तात्काळ माफ करण्याची मागणी केली आहे. आता प्रशासन गरीबाला न्याय देते की ४५ हजारांसाठी त्याचे घराचे स्वप्न उद्ध्वस्त करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!