बुलढाणा (हॅलो बुलढाणा) गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील जलसाठ्यांमध्ये हळूहळू वाढ होत असून, परिसरासाठी जीवनदायी ठरणारे येळगाव धरण आता ३२ टक्के भरले आहे. पावसाने दमदार हजेरी लावल्याने धरण क्षेत्रात पाण्याची आवक वाढली असून पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे. यामुळे नागरिकांबरोबरच शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
उन्हाळ्यात पाण्याची चिंता आणि खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची धाकधूक वाढली होती. मात्र आता धरणात ३२ टक्के जलसाठा झाल्याने पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठीही काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. परिसरातील गावांसाठी हे धरण महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे जलसाठ्यात झालेली वाढ नागरिकांसाठी समाधानकारक ठरत आहे.
दरम्यान, पावसाचा जोर पुढील काही दिवस कायम राहिल्यास धरणाच्या जलसाठ्यात आणखी वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पूर्ण क्षमतेने धरण भरण्याची आशा बळावली आहे. सध्या तरी येळगाव धरणाने पाणीचिंतेवर काही प्रमाणात फुंकर घातली असून, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागले आहे.










