बुलढाणा/चिखली (हॅलो बुलढाणा) बुलढाणा आणि चिखली नगरपरिषदांच्या मालकीच्या शासकीय भूखंडांबाबत एक मोठा आणि गंभीर प्रकार समोर येत असल्याची धक्कादायक माहिती मिळत आहे. शासनाच्या मालकीची जमीन बनावट व संशयास्पद कागदपत्रांच्या आधारे वर्ग-2 मधून वर्ग-1 मध्ये रूपांतरित करण्याचा कथित गोरखधंदा काही भूमाफिया, खासगी एजंट आणि संबंधित यंत्रणेतील काही घटकांच्या संगनमताने सुरू असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणात हाती लागलेल्या कागदपत्रांची प्राथमिक पडताळणी सुरू असून, त्या आधारे ‘हॅलो बुलढाणा’ या कथित भूखंड घोटाळ्याचा सखोल पाठपुरावा करणार आहे. शहरातील काही मोठे व्हाईट कॉलर उद्योजक, बाहेरून प्रतिष्ठित चेहरा दाखवणारे मात्र पडद्यामागे कथित गोलमाल करणारे ‘नंबरी’ लोक, खासगी एजंट आणि तत्कालीन प्रशासनातील काही अधिकारी-कर्मचारी यांच्या भूमिकेकडे आता संशयाने पाहिले जात आहे.
धक्कादायक म्हणजे या कथित साखळीत तत्कालीन जिल्हाधिकारी कार्यालय, भूमिअभिलेख विभाग, महसूल विभाग, नगर परिषद, जिल्हा निबंधक कार्यालय, वर्ग-1 व वर्ग-2 नोंदणीशी संबंधित कार्यालये आणि इतर विभागांतील काही घटकांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात असल्याची चर्चा आहे. मात्र ‘हॅलो बुलढाणा’ कोणताही निष्कर्ष घाईत काढणार नसून, प्रत्येक बाब कागदपत्रे, नोंदी, फेरफार, मंजुरी प्रक्रिया आणि व्यवहारांच्या आधारेच जनतेसमोर मांडणार आहे.
शासकीय भूखंड हे जनहितासाठी, विकास आराखड्यानुसार आणि डी-प्लानप्रमाणे वापरले जाणे अपेक्षित असते. मात्र जर अशा जमिनींवर भूमाफियांनी डल्ला मारला असेल, तर हा प्रकार केवळ आर्थिक घोटाळा नाही; तर जनतेच्या हक्कांवर टाकलेला थेट डाका आहे.
या कथित प्रकरणात ‘अर्धे तुम्ही, अर्धे आम्ही’ या पद्धतीने काहींचे शेअर्स असल्याचीही माहिती समोर येत आहे. समाजात स्वतःला उच्चभ्रू, प्रतिष्ठित आणि स्वच्छ प्रतिमेचे मानणारे काही चेहरे या रॅकेटमध्ये असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे काही अधिकारी-कर्मचारी यांच्या भूमिकेबाबतही कागदपत्रांच्या आधारे गंभीर प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे.
‘हॅलो बुलढाणा’ या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे करणार आहे. नोंदी कशा बदलल्या? फेरफार कोणी केले? मंजुरी कोणाच्या सहीने झाली? निबंधक कार्यालयातील व्यवहार कसे झाले? वर्ग-2 जमिनीचे वर्ग-1 मध्ये रूपांतर कोणाच्या आशीर्वादाने झाले? आणि या संपूर्ण कथित खेळात चालू ‘चड्डा 420’ टोळीची भूमिका नेमकी काय? या सर्व प्रश्नांची उत्तरे आता टप्प्याटप्प्याने समोर आणली जाणार आहेत.
जोपर्यंत संबंधित शासकीय जागांचा खरा चेहरा जनतेसमोर येत नाही, जोपर्यंत दोषींवर फौजदारी स्वरूपाची कारवाई होत नाही आणि शासकीय भूखंडांचा गैरवापर थांबत नाही, तोपर्यंत ‘हॅलो बुलढाणा’चा हा लढा सुरूच राहणार आहे.










