मुंबई/बुलढाणा (हॅलो बुलढाणा/ संतोष जाधव) राज्यात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात SIR–२०२६ प्रक्रियेमुळे जिल्हा परिषद शिक्षकांवर अतिरिक्त प्रशासकीय कामाचा मोठा भार पडत आहे. या कामाच्या ओझ्यामुळे शिक्षकांचे मुख्य काम असलेल्या अध्यापनावर परिणाम होत असून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची गंभीर शक्यता निर्माण झाली आहे. याच मुद्द्यावर सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज कायंदे यांनी आज विधान भवनात शासनाचे लक्ष वेधत आक्रमक भूमिका घेतली.
शिक्षकांना अध्यापनाऐवजी सतत विविध प्रशासकीय कामांमध्ये गुंतवले जात असल्याने ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिक्षणाचा दर्जा घसरू शकतो, असा इशारा आमदार कायंदे यांनी दिला. आधीच जिल्हा परिषद शाळा अनेक अडचणींना सामोरे जात असताना शिक्षकांवर वाढणारा हा अतिरिक्त ताण विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणारा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, शिक्षकांवरील अतिरिक्त कामाचा भार कमी करावा आणि शिक्षणाची गुणवत्ता अबाधित राखावी, अशी जोरदार मागणी आमदार मनोज कायंदे यांनी विधानसभेत केली. या मुद्द्यामुळे शिक्षण क्षेत्रात पुन्हा एकदा मोठी चर्चा रंगली आहे.











Total Users : 3354247