खामगाव (हॅलो बुलढाणा) शहरालगतच्या रावणटेकडी बायपास रोड परिसरात एक धक्कादायक आणि भयावह प्रकार घडला आहे. मैदानात चरत असलेल्या बकऱ्यांवर चोरट्यांनी भरदिवसा डल्ला मारत चक्क लांब कारमधून येऊन ४ बकऱ्या आणि बकरीचे एक नर पिल्लू उचलून नेल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगल पांडुरंग विचकुले वय 24 वर्ष, रा. वारोळी, ता. मोताळा हे आपल्या कुटुंबासह दरवर्षी पावसाळ्यात खामगाव येथील रावणटेकडी परिसरात मेंढ्या व बकऱ्यांसह मुक्कामाला येतात. यावर्षीही ते सुमारे 200 मेंढ्या आणि 40 बकऱ्यांसह रावणटेकडी परिसरातील मैदानावर झोपड्या करून राहत होते.
दिनांक 06 जुलै रोजी सकाळी 9 वाजताच्या सुमारास काही बकऱ्या चरता चरता बायपास रोडकडे गेल्या. याच वेळी अचानक एक लांब कार तेथे आली. कारमधून दोन अनोळखी इसम खाली उतरले आणि रस्त्यालगत चरत असलेल्या बकऱ्यांमधून बकऱ्या उचलून थेट कारमध्ये टाकू लागले. हा प्रकार पाहताच फिर्यादीची वहिनी रेखाबाई पटु विचकुले यांनी जोरात आरडाओरडा करत कारकडे धाव घेतली. मात्र तोपर्यंत चोरट्यांनी काही बकऱ्या कारमध्ये टाकल्या आणि कार सुरू करून क्षणार्धात तेथून सुसाट पळ काढला.
यानंतर कुटुंबीयांनी बकऱ्या मोजल्या असता 4 बकऱ्या आणि एक नर पिल्लू कमी असल्याचे लक्षात आले. चोरी गेलेल्या मालाची किंमत अंदाजे 50 हजार रुपये आहे. परिसरात शोधाशोध करूनही काहीच सुगावा न लागल्याने शिवाजीनगर पोलीस स्टेशन, खामगाव येथे तक्रार देण्यात आली.
या प्रकरणी अप. क्र. 262/2026 कलम 303(2) भारतीय न्याय संहिता 2023 अन्वये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेड कॉन्स्टेबल संदीप टाकसाळ यांच्याकडे देण्यात आला आहे. भरदिवसा कारमधून बकऱ्या पळवण्याच्या या थरारक घटनेने रावणटेकडी परिसर हादरला आहे.










