spot_img
spot_img

रिसोड-सोनाटी रोडवरून लाल गाडी सुसाट निघाली… पोलिसांनी पाठलाग सुरू केला… अन् मेहकरच्या गणपूर फाट्यावर उघड झाला थरार! मोक्का कारवाईतील अट्टल गुन्हेगार धारदार शस्त्रांसह जेरबंद

मेहकर (हॅलो बुलढाणा) तालुक्यात आज पोलिसांनी केलेल्या धडाकेबाज कारवाईने गुन्हेगारी विश्वात खळबळ उडाली आहे. मोक्का कारवाईतील आणि रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार लाल रंगाच्या गाडीतून मेहकर शहराकडे येत असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार यांना मिळताच पोलीस यंत्रणा क्षणाचाही विलंब न करता अलर्ट झाली.

माहितीनुसार, रिसोड-सोनाटी रोडमार्गे मेहकरकडे येणारी MH-31-FA-5820 क्रमांकाची लाल रंगाची गाडी, ज्याच्या मागील काचावर ‘जगदंब’ असे लिहिलेले होते, ही गाडी पोलिसांच्या नजरेस पडली. पोलिसांनी वाहन थांबविण्याचा इशारा दिला; मात्र चालकाने गाडी न थांबवता ती भरधाव वेगाने बायपास मार्गे सारंगपूर-बरटाळा फाट्याकडे पळवली. यानंतर पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करत गणपूर फाट्याजवळ गाडीला शिताफीने अडवले.

गाडी थांबताच आतील तिघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यातील एकजण पसार झाला, तर दोन आरोपींना पोलिसांनी पाठलाग करून पकडले. अमोल परात्या भोसले वय २५, रा. बरटाळा आणि अजय दहीमल भोसले वय २६, रा. वरदडा अशी अटक आरोपींची नावे आहेत.

गाडीची पंचांसमक्ष झडती घेतली असता लाकडी मुठीचा मोठा सुरा, चाकू, धारदार सुरी, ऑटोमॅटिक चाकू, रेडमी मोबाईल आणि Datsun Redi-Go गाडी असा एकूण २ लाख ६६ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. फरार आरोपीच्या शोधासाठी परतापूर, उकळी आणि सुकळी परिसरात कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले.

अटक आरोपी अमोल भोसले हा कुख्यात गुन्हेगार असून त्याच्यावर बुलढाणा, वाशीम, नांदेड, लातूरसह विविध जिल्ह्यांत खुनाचा प्रयत्न, दरोडा, घरफोडी, शस्त्र बाळगणे यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी मेहकर पोलीस स्टेशनमध्ये अप. क्र. ४५७/२०२६ भारतीय शस्त्र अधिनियम कलम ४/२५ तसेच म.पो.का. कलम १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार आणि मेहकर पोलिसांच्या पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी केली.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!