बुलढाणा (हॅलो बुलढाण) शिक्षण क्षेत्रातून बुलढाण्यासाठी अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. मुंबई सायन्स टीचर्स असोसिएशनतर्फे घेण्यात आलेल्या डॉ. होमीभाभा बालवैज्ञानिक परीक्षेत सहकार विद्या मंदिर, बुलढाणा येथील इयत्ता सहावीचा विद्यार्थी चि. अमेय आनंद महाजन याने दमदार कामगिरी करत रौप्य पदक पटकावले आहे.
ही परीक्षा तीन स्तरांमध्ये घेतली जाते. पहिल्या स्तरात अमेयने 69 गुण मिळवले, तर दुसऱ्या स्तरात 22.5 गुण मिळवत त्याने तृतीय स्तरासाठी म्हणजेच मुलाखतीसाठी आपली निवड निश्चित केली. तिसऱ्या स्तरावर अमेयने “Earth System Interaction & Human Action” या विषयावर कृती संशोधन सादर केले. या उत्कृष्ट सादरीकरणाच्या जोरावर त्याने रौप्य पदक पटकावून शाळेचे, शिक्षकांचे आणि बुलढाणा शहराचे नाव उज्ज्वल केले.
अमेयच्या या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा सौ. कोमल झंवर, प्राचार्य, मुख्याध्यापिका आणि शिक्षकवृंदांनी त्याचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
अमेयने आपल्या यशाचे श्रेय संस्थेच्या अध्यक्षा, प्राचार्य, मुख्याध्यापिका आणि सर्व शिक्षकवृंदांना दिले आहे. बालवयात विज्ञान क्षेत्रात घेतलेली ही झेप निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे.










