spot_img
spot_img

खड्डे, उघडी खडी अन् खचलेला पूल! घूटी-पारडी मार्गावर अपघाताची घंटा वाजतेय

मेहकर (हॅलो बुलढाणा/अनिल राठोड) तालुक्यातील घूटी ते पारडी दरम्यानचा ५.७० किलोमीटरचा जोडरस्ता सध्या रस्ता कमी आणि मृत्यूचा सापळा जास्त बनला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे या मार्गाची अक्षरशः चाळण झाली असून, संपूर्ण रस्त्यावरील डांबर गायब झाले आहे. उघडी पडलेली खडी, जागोजागी पडलेले खोल खड्डे आणि पावसामुळे तयार झालेली चिखलमय अवस्था यामुळे वाहनधारक, शेतकरी, विद्यार्थी आणि रुग्णांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

याहूनही गंभीर बाब म्हणजे, नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे या मार्गावरील एका पुलाचे सिमेंट पाईप फुटले असून पुलाला मोठे भगदाड पडले आहे. पूल खचल्याने येथे कधीही मोठा अपघात होऊ शकतो. एखादे वाहन या भगदाडात कोसळल्यास निष्पाप नागरिकांचा बळी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, या सर्व परिस्थितीकडे सार्वजनिक बांधकाम उपविभागाने अद्यापही डोळेझाक केल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

घूटी ग्रामपंचायतीने या गंभीर प्रश्नावर प्रशासनाला पुन्हा एकदा लेखी पत्र देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, नोव्हेंबर २०२४ आणि मार्च २०२५ मध्येही ग्रामपंचायतीने रस्ता व पुलाच्या दुरवस्थेबाबत अधिकृत पत्रव्यवहार केला होता. मात्र तब्बल दीड-दोन वर्षे पाठपुरावा करूनही संबंधित अधिकाऱ्यांनी केवळ कागदी घोडे नाचवले, असा आरोप नागरिक करत आहेत.

प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे नागरिकांच्या जिवाशी उघड खेळ सुरू असल्याचा संतप्त सूर उमटत आहे. मोठी जीवितहानी झाल्यावरच अधिकारी जागे होणार का? असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत. रस्ता व पूल तातडीने दुरुस्त न झाल्यास ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!