बुलढाणा (हॅलो बुलढाणा) आज शनिवार… वीर हनुमानांचा दिवस. याच दिवशी बुलढाणा–धाड मार्गावर घडलेल्या एका प्रसंगाने माणुसकी अजूनही जिवंत असल्याचे दाखवून दिले. बुलढाणा न.प नगरसेवक अनिल वर्मा व उद्योजक मनीष वर्मा यांचे भाचे व विनोद वर्मा यांचे सुपुत्र शुभम वर्मा हे नेहमीप्रमाणे आपल्या धाड येथील दुकानाकडे जात होते. त्याच वेळी रस्त्यावर एक माकड गंभीर अवस्थेत तडफडताना त्यांना दिसले.
माहितीनुसार, कोणत्यातरी अज्ञात वाहनाने त्या माकडाला धडक दिली होती. माकड मृत्यूशी झुंज देत रस्त्यावर विव्हळत होते. हा प्रसंग पाहताच शुभम वर्मा यांनी क्षणाचाही विलंब न करता वाहन थांबवले आणि रस्त्यावर उतरून त्या माकडाचा जीव वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. त्यांच्या मदतीला रस्त्याने जाणारे नागरिकही धावून आले.
एका बाजूला माकडाची जीवासाठी तडफड सुरू होती, तर दुसऱ्या बाजूला शुभम वर्मा त्याला वाचवण्यासाठी जीव तोडून प्रयत्न करत होते. अखेर शुभम वर्मा आणि उपस्थित नागरिकांच्या प्रयत्नांना यश आले आणि त्या माकडाला जीवनदान मिळाले.शनिवारी वीर हनुमानांच्या दिवशी घडलेल्या या माणुसकीच्या प्रसंगामुळे शुभम वर्मा यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.










