देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा) शांततेने जीवन जगणाऱ्या शिकलगर समाजाची प्रतिमा काही कथित गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमुळे मलीन होत असल्याचा आरोप करत देऊळगाव राजा व सिंदखेडराजा परिसरातील शिकलगर समाजबांधव आता आक्रमक झाले आहेत. संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई करून त्यांना जिल्हाबंदी करण्यात यावी, अशी मागणी समाजबांधवांनी थेट जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यलय तसेच देऊळगाव राजा पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शिकलगर समाज गेल्या 20 ते 25 वर्षांपासून देऊळगाव राजा व सिंदखेडराजा परिसरात वास्तव्यास असून मेहनत-मजुरी, वराह व्यवसाय आणि इतर व्यवसायातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे. समाजातील अनेक कुटुंबे आपल्या मुलांना चांगले शिक्षण देऊन उच्च पदावर पोहोचविण्यासाठी संघर्ष करत आहेत. मात्र याच समाजातील काही कथित गावगुंडांच्या बेकायदेशीर कृत्यांमुळे संपूर्ण समाजाला बदनामी, संशय आणि मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याची खंत समाजबांधवांनी व्यक्त केली.
निवेदनात चोरी, घरफोडी, दादागिरी, मारहाण तसेच बाहेरील गुन्हेगारांशी संबंध ठेवून परिसरातील गुन्हेगारीला खतपाणी घालण्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. अशा प्रवृत्तीमुळे महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, कायद्याचे पालन करणाऱ्या समाजबांधवांनाही विनाकारण संशयाच्या नजरेने पाहिले जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
संबंधित व्यक्तींच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची सखोल चौकशी करून महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार तडीपार व जिल्हाबंदीची कारवाई करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी यांनी निवेदन स्वीकारून कायदेशीर पडताळणी करून नियमानुसार कारवाई करण्याचे आश्वासन दिले. कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱ्या घटकांवर दया दाखविली जाणार नाही, असा इशाराही देण्यात आल्याची माहिती समाजबांधवांनी दिली.










