देऊळगाव मही (हॅलो बुलढाणा/संतोष जाधव) आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर विठूरायांच्या भेटीसाठी निघालेल्या आदीशक्ती संत मुक्ताबाईंच्या पालखीचे देऊळगाव महीत गुरुवारी दुपारी भक्तिमय वातावरणात आगमन झाले. भरपावसात टाळ-मृदंगाचा निनाद, “मुक्ताबाई… मुक्ताबाई… विठोबा-रखुमाई”चा जयघोष आणि भाविकांचा उस्फूर्त सहभाग यामुळे संपूर्ण शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही संत मुक्ताबाईंची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली असून, तब्बल १ हजार ५०० किलोमीटरचा पायी वारी प्रवास ७४ दिवसांत पूर्ण होणार आहे. राज्यातील ३५ तालुके, अनेक शहरे व खेड्यांतून ही पालखी मार्गक्रमण करत पंढरपूरला पोहोचणार आहे.
देऊळगाव महीत पालखी दाखल होताच विठ्ठल मंदिर संस्थान, एकता ग्रुप ढोल पथक, वारकरी संप्रदाय आणि भाविकांनी मनोभावे स्वागत केले. ठिकठिकाणी रांगोळ्या, फुलांची उधळण, फटाक्यांची आतषबाजी करत वारकऱ्यांचे स्वागत करण्यात आले. हॉटेल प्रसाद परिसरात वारकऱ्यांना चहा-पाणी, तर शहरात विविध ठिकाणी बिस्किटे, फराळ पाकिटांचे वाटप करण्यात आले.
या सोहळ्यादरम्यान देऊळगाव राजा ठाणेदार ब्रम्हा गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी पथकासह पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.










