चिखली (हॅलो बुलढाणा/सय्यद साहिल) शेतात काडी-कचरा वेचण्यासाठी गेलेल्या मायलेकींना “तुम्ही परत शेतात कशा काय आल्या?” असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार चिखली तालुक्यातील शेलगाव जहाँगीर शिवारात समोर आला आहे. या प्रकरणी पीडितेच्या मुलीने दिलेल्या तोंडी फिर्यादीवरून चिखली पोलिसांनी चार जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 30 जून 2026 रोजी सकाळी सुमारे 11.30 वाजता फिर्यादी या त्यांच्या आईसोबत शेलगाव जहाँगीर शेत शिवारातील गट क्रमांक 85 मध्ये काडी-कचरा वेचत होत्या. यावेळी 4 ही आरोपी सर्व रा. शेलुद, ता. चिखली यांनी संगनमताने फिर्यादी व त्यांच्या आईला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.
यावेळी आरोपींनी फिर्यादीच्या आईच्या डोक्यात काठी व लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केल्याचे तक्रारीत नमूद आहे. एवढ्यावरच न थांबता “तुम्ही दोघी खूप माजल्या” असे म्हणत फिर्यादीच्या आईच्या अंगावर बसून तिची साडी वर केल्याचा आणि “तुझा बलात्कार करतो” अशी धमकी दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी अप. नं. 572/2026 अन्वये कलम 118(1), 115(2), 352, 351(2), 351(3), 74, 75, 3(5) भारतीय न्याय संहिता तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमातील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.











