अमडापुर (हॅलो बुलढाणा) रात्रीची वेळ… बसस्थानक परिसरात नेहमीप्रमाणे नागरिकांची वर्दळ… पण अचानक एका पिकअप वाहनातून येणाऱ्या तीव्र दुर्गंधीने परिसरात खळबळ उडाली. नेमकं वाहनात काय आहे? हा प्रश्न उपस्थित होत असतानाच अमडापुर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि काळ्या कापडाखाली दडलेला धक्कादायक प्रकार समोर आला.
दि. २८ जून २०२६ रोजी रात्री सुमारे ९ वाजता अमडापुर पोलिसांना माहिती मिळाली की, चिखलीकडून अमडापुरकडे एक टाटा मेगा पिकअप क्रमांक MH 04 JU 1447 भरधाव वेगाने व निष्काळजीपणे आला असून बसस्थानकाजवळील शंकर हॉटेलसमोर उभा आहे. वाहनातून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत असून आत जनावरांची शिंगे दिसत आहेत.
माहिती मिळताच पोउपनि बालाजी सानप, ग्रेड पोउपनि अच्युतराव सिरसाठ, पोलीस कर्मचारी दुर्गासिंग ठाकुर, प्रदीप चोपडे आदींनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. वाहनचालकाला विचारणा केली असता त्याने आपले नाव सैय्यद मुखतार सैय्यद सत्तार, वय ५५ वर्ष, रा. चिखली असे सांगितले. मात्र वाहनात काय आहे, याबाबत त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.
यानंतर पोलिसांनी पिकअपची तपासणी केली असता काळ्या कापडाखाली पांढऱ्या रंगाच्या २५ पोत्यांमध्ये वेगवेगळ्या आकाराची जनावरांची शिंगे आढळली. काही शिंगे वाहनात मोकळीही ठेवलेली होती. एकूण अडीच क्विंटल शिंगे जप्त करण्यात आली असून त्यांची अंदाजे किंमत २५ हजार रुपये आहे. या शिंगांमधून प्रचंड दुर्गंधी येत असल्याने मानवी आरोग्यास धोका व संसर्ग पसरण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.
वाहनचालकाकडे शिंगांच्या वाहतुकीचा कोणताही परवाना नसल्याचे पंचासमक्ष स्पष्ट झाले. पशुधन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शिंगांची पाहणी करून नमुने घेतले आहेत. या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २७१, २८१, २८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमडापुर पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.











