बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी खेळ करणाऱ्या अवैध विद्यार्थी वाहतुकीवर बुलढाणा आरटीओने अखेर मोठा बडगा उगारला आहे. नियम धाब्यावर बसवून विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या पथकाने धडक कारवाई करत तब्बल १८ वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. यापैकी ९ वाहने थेट जप्त करण्यात आली असून, या कारवाईमुळे अवैध विद्यार्थी वाहतूकदारांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी कोंबणे, आवश्यक कागदपत्रांचा अभाव, फिटनेस प्रमाणपत्र नसणे, स्कूल बस सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष करणे, अशा गंभीर त्रुटी आढळत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे येत होत्या. या पार्श्वभूमीवर बुलढाणा आरटीओने शहरासह परिसरात अचानक तपासणी मोहीम राबवली. या मोहिमेत नियम मोडणाऱ्यांना कोणतीही सूट न देता थेट कारवाई करण्यात आली.
या कारवाईत एकूण १८ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, त्यातील ९ वाहने अटकावून ठेवण्यात आली. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांकडून एकूण १ लाख ३२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने स्पष्ट इशारा दिला आहे की, विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या प्रत्येक वाहनाने शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांची यापुढे गय केली जाणार नाही. ही मोहीम पुढेही अधिक तीव्रतेने सुरू राहणार असल्याचे आरटीओ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पालकांनीही आपल्या मुलांना शाळेत पाठवताना अधिकृत, सुरक्षित आणि नियमबद्ध वाहनांचाच वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. नवीन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पवन नवाडे आणि सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी रघुवीर सिंग बिलावर यांच्या मार्गदर्शनाखाली विवेक भंडारे, महाजन आणि सतीश तुले यांच्या नेतृत्वात ही कारवाई पार पडली.











