बुलढाणा (हॅलो बुलढाणा) खरीप हंगाम ऐन तोंडावर असतानाच बुलढाणा जिल्ह्यात डीएपी व इतर रासायनिक खतांचा भीषण तुटवडा निर्माण झाल्याने शेतकरी संतापले आहेत. कृषी सेवा केंद्रांवर डीएपीचा साठा संपुष्टात आल्याने शेतकऱ्यांना दिवसभर रांगेत उभे राहूनही रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. दुसरीकडे चिखली व मेहकर तालुक्यात चढ्या दराने खत विक्री होत असल्याच्या तक्रारींमुळे शेतकऱ्यांमध्ये रोष उसळला आहे.
या गंभीर परिस्थितीच्या निषेधार्थ क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी थेट जिल्हा परिषद गाठून कृषी विकास अधिकारी इंगळे यांना घेराव घातला. यावेळी तुपकरांनी प्रशासनाला धारेवर धरत जिल्ह्यासाठी राखीव ठेवण्यात आलेला डीएपी खताचा बफर स्टॉक तात्काळ खुला करण्याची जोरदार मागणी केली.
या आंदोलनात जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले, विनायक सरनाईक, अमोल मोरे, गजानन भोपळे, गुरुदत्त बाप्पू, अमीन खासाब, राम अंभोरे, पवन काकडे, राहुल शेलार, दत्ता जेऊघाले, नितीन सोनटक्के, भीमराव हिवरकर, ऋषी भोपळे, विश्वास पाटील, कैलास उतपूरे, सुरेश खरात, अनंता गाडे, विष्णू पवार, महेंद्र जाधव, विजय गायकवाड, अनंता हिवरकर यांच्यासह चिखली व मेहकर तालुक्यातील शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.
चर्चेदरम्यान रविकांत तुपकर यांनी जिल्हाधिकारी प्रवीण देवरे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत बफर स्टॉक खुला करणे, चिखली तालुक्याचा खत कोटा वाढवणे, शासनमान्य दरात पारदर्शक वितरण करणे, काळाबाजार रोखणे आणि प्रत्येक तालुक्याचा साठा जाहीर करण्याची मागणी केली.
“दोन दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा कृषी विभागाच्या चिखली व बुलढाणा कार्यालयांवर शेतकऱ्यांसह तीव्र आंदोलन छेडू. शेतकऱ्यांची लूट आणि कृत्रिम तुटवडा अजिबात खपवून घेतला जाणार नाही,” असा संतप्त इशारा रविकांत तुपकर यांनी दिला.












