spot_img
spot_img

रुपेरी पडद्यावर ‘दलित पॅंथर’ संघर्षाचे वादळ घोंगावणार! अभिता कंपनी प्रोडक्शनचे सीईओ सुनील शेळके यांची निर्मिती; ‘मिशन पँथर 1970’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

बुलढाणा/मुंबई (हॅलो बुलढाणा) दलित पँथर चळवळीच्या सामाजिक आणि ऐतिहासिक संघर्षावर आधारित आगामी ‘मिशन पँथर 1970’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. अभिता फिल्म प्रॉडक्शन्सची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे पोस्टर निर्माते तथा अभिता फिल्म प्रॉडक्शन्सचे सीईओ सुनील शेळके आणि दिग्दर्शक शैलेंद्र बागडे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. १९७०च्या दशकात अन्याय, सामाजिक विषमता आणि शोषणाविरोधात तसेच सामाजिक न्यायासाठी उभ्या राहिलेल्या दलित पँथर चळवळीच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट आधारित आहे.

दलित पँथर या चळवळीने अन्यायाविरोधात आवाज उठवत सामाजिक परिवर्तनाच्या लढ्याला नवी दिशा दिली. चळवळीचा संघर्ष, विचार आणि सामाजिक परिवर्तनातील योगदान रुपेरी पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे. चित्रपटात सुप्रसिद्ध अभिनेता चिन्मय मांडलेकर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्या सोबत अंजली पाटील, कैलास वाघमारे, कमलेश सावंत, संदेश जाधव, विनीत शर्मा, किरण बागडे, पार्थ तिवारी, अंकुश गेडाम आणि गणेश देशमुख हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत. दमदार कलाकारांची फळी आणि सामाजिक आशय यामुळे चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

▪️पाच भाषांमध्ये होणार प्रदर्शन!

‘मिशन पँथर 1970’ केवळ मराठीपुरता मर्यादित न राहता हिंदी, तेलुगू, तमिळ आणि कन्नड या भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे सामाजिक न्यायाच्या लढ्याचा हा ऐतिहासिक अध्याय संपूर्ण देशातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे. यापूर्वी निर्माते सुनील शेळके यांच्या निर्मितीतील ‘सत्यशोधक’ या चित्रपटातून महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक कार्याचा आणि विचारांचा इतिहास रुपेरी पडद्यावर मांडण्यात आला होता. त्यानंतर आता सामाजिक न्यायाच्या चळवळीतील महत्त्वाचा अध्याय असलेल्या दलित पँथर चळवळीवर आधारित ‘मिशन पँथर 1970’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. सामाजिक न्याय, समता आणि परिवर्तनाच्या लढ्याचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने हा चित्रपट महत्त्वपूर्ण ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!