डोणगाव (हॅलो बुलडाणा) कळसकरवाडी येथे जनगणनेसारख्या शासकीय कामात चक्क शाळकरी लहान मुलांचा वापर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
आज १९ मे रोजी सकाळी सुमारे साडेआठ वाजता कळसकरवाडी भागात घरगणनेचे काम सुरू असताना एका शाळेतील शिक्षकाने शालेय विद्यार्थ्यांना थेट जनगणनेच्या कामात सहभागी करून घेतल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. अल्पवयीन मुलांना शैक्षणिक वेळेत आणि अभ्यासाऐवजी शासकीय कामासाठी वापरणे हे गंभीर व बेकायदेशीर असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
या प्रकारामुळे पालकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला असून शिक्षणाच्या हक्कावर गदा आणणारा हा प्रकार आहे अशी तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. शालेय मुलांचे शारीरिक व मानसिक शोषण होत असल्याचा आरोपही काही पालकांनी केला आहे.
दरम्यान, या घटनेची तातडीने चौकशी करून संबंधित शिक्षकावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. शालेय प्रशासन आणि शिक्षण विभाग या प्रकरणाची गंभीर दखल घेणार का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
हा प्रकार खरोखरच घडला की गैरसमज आहे, याबाबत अधिकृत चौकशीची प्रतीक्षा आहे, मात्र सध्या तरी डोणगाव परिसरात या घटनेने खळबळ उडवली आहे.










