ज.जामोद (हॅलो बुलडाणा/ज्ञानदेव राजनकर) छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त ‘श्री संत आवजी सिद्ध महाराज नगरी’ सुनगांव येथे दिनांक १४ मे २०२६ रोजी अभूतपूर्व उत्साहात आणि अत्यंत देखण्या स्वरूपात ‘सांस्कृतिक भव्य शोभायात्रा’ पार पडली.अवघ्या गावकऱ्यांच्या आणि पंचक्रोशीतील शिवभक्तांच्या अथांग जनसागराने या सोहळ्याला एका ऐतिहासिक महोत्सवाचे स्वरूप दिले होते.या शोभायात्रेचा प्रारंभ ‘श्री लहाने आवजी सिद्ध महाराज मंदिरा’पासून करण्यात आला. मंदिराच्या पवित्र आवारातून सुरू झालेली ही शोभायात्रा संपूर्ण सुनगांवातील मुख्य मार्गावरून अतिशय शिस्तीत आणि दिमाखात काढण्यात आली.हरिनामाचा गजर,भगवे झेंडे आणि शिवरायांच्या-शंभूराजांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणला होता.केवळ मिरवणूक न काढता या शोभायात्रेच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचा आणि संस्कृतीचा अनोखा संगम पाहायला मिळाला.छत्रपती संभाजी महाराज आणि कविकलेश यांचा ‘धर्मरक्षण झुंज’ देखावा उपस्थितांचे डोळे दिपवून गेला. यासोबतच बाल शंभू, जिजाऊ माता आणि महाराणी येसूबाई यांच्या जिवंत देखाव्यांनी इतिहास जिवंत केला.घोड्यांवर स्वार झालेली आणि हातात तलवार घेतलेली पराक्रमी ‘नारीशक्ती’, गौमाता पूजन आणि तुळशी पूजन यांमुळे भारतीय संस्कृतीचे दर्शन घडले. ‘ आरएसएस जगदंबा धर्म आखाडा वानखेड’ यांच्या चित्तथरारक लाठी-काठी आणि मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांनी उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे केले.गावातील भजनी मंडळाच्या टाळ-मृदुंगाच्या गजर आणि सोबतीला ‘व्यसनमुक्ती व समाजसेवा’ यांसारखे प्रबोधनात्मक देखावे समाजाला योग्य दिशा देणारे ठरले.
हा भव्य सोहळा सुरक्षित आणि शांततेत पार पाडण्यासाठी ठाणेदार नितीन कुमार पाटील,एपीआय नागेश मोहोळ, निलेश पुंडे,सचिन राजपूत,आणि सुनगांव चे बीड जमदार, पत्रकार अनिल भगत, गणेश भड, पोलीस पाटील पती मनिष तडवी यांच्यासह मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.यावेळी पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक अशोक काळपांडे यांनी उपस्थित राहून या संपूर्ण सोहळ्याचे अत्यंत सुंदर नियोजन करत मोलाचे सहकार्य केले.या सोहळ्याच्या अभूतपूर्व यशामागे गावातील तरुण रक्ताची अहोरात्र मेहनत आणि नियोजन कारणीभूत होते.राहुल ढेले, रोहित हागे, दीपक पाटील, राहुल धर्मे, सचिन लाहुडकार, केशव मिसाळ, आनंद आंबेकर, सूरज हिसल, विजय जमरा, रोहन हागे, रोहित कपले, विशाल राजपूत, अभिषेक धुडे, नंदू काळपांडे, धीरज भटकर आणि त्यांचे सर्व कार्यरत मित्र परिवाराने नियोजन केले होते.परंतु, या सोहळ्याचे खरे मानकरी ठरले ते सुनगांवचे सर्व अबालवृद्ध गावकरी! संपूर्ण गावाने जात-पात-भेद विसरून एकत्र येत या सांस्कृतिक भव्य शोभायात्रेत आपला मोलाचा सहभाग नोंदवला.सर्व गावकऱ्यांच्या शिस्तीमुळे आणि सहकार्यामुळेच छत्रपती संभाजी महाराज जयंतीची ही भव्य सांस्कृतिक शोभायात्रा अत्यंत आनंदात आणि शांततेत पार पडली.छत्रपती संभाजी महाराज की जय!च्या घोषणांनी संपूर्ण सुनगांव नगरी दुमदुमून गेली होती.











