spot_img
spot_img

डोणगावात रोडरोमिओंना दामिनीचा ‘झटका’! बसस्थानकावर धडक कारवाई; ५ जण ताब्यात, पालकांसमोरच कडक समज!

डोणगाव (हॅलो बुलढाणा/ अनिल राठोड) बसस्थानक आणि शाळा-महाविद्यालय परिसरात टवाळखोरी करत मुलींना त्रास देणाऱ्यांविरोधात दामिनी पथकाने शुक्रवारी धडक मोहीम राबवत पाच तरुणांना ताब्यात घेतले. अचानक झालेल्या या कारवाईने परिसरातील रोडरोमिओंचे अक्षरशः धाबे दणाणले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून शाळा-कॉलेज सुटण्याच्या वेळेत बसस्थानक व मुख्य चौकांमध्ये टवाळखोर तरुणांचा वावर वाढल्याच्या तक्रारी समोर येत होत्या. या प्रकाराची गंभीर दखल घेत उपविभागीय अधिकारी संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी पथकाने १७ जुलै रोजी डोणगाव बसस्थानक परिसरात अचानक धडक दिली.

पथकप्रमुख पीएसआय द्रोपदी साळवे, कॉन्स्टेबल पल्लवी मुळे, चालक पहारे तसेच डोणगाव पोलीस ठाण्याचे पीएसआय अजमिरे आणि वाहतूक पोलीस हर्ष सहगल यांच्या पथकाने संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या पाच तरुणांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले.

चौकशीनंतर संबंधितांना पुन्हा असे कृत्य न करण्याची कडक समज देण्यात आली. एवढ्यावरच न थांबता त्यांच्या पालकांना पोलीस ठाण्यात बोलावून मुलांच्या कृत्याची माहिती देण्यात आली आणि प्रतिबंधक कारवाईनंतर पाचही जणांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.

“पुन्हा छेडछाड किंवा त्रासाची तक्रार आल्यास थेट कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. मुलींनी कोणताही त्रास सहन न करता तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा,” असा स्पष्ट इशारा दामिनी पथकप्रमुख द्रोपदी साळवे यांनी दिला.

या कारवाईमुळे डोणगावातील टवाळखोरांना चांगलाच चाप बसला असून विद्यार्थिनी, महिला आणि पालकांकडून पोलिसांच्या कारवाईचे जोरदार स्वागत होत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!