जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा/ ज्ञानदेव राजनकर) येथे भूमी अभिलेख कार्यालयातील भ्रष्टाचाराचा भांडाफोड करत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धडक कारवाई केली. भूखंड मोजणी अर्जातील त्रुटी काढून टाकण्यासाठी आणि प्रक्रिया जलद करण्याच्या नावाखाली तब्बल १० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना १२ मे रोजी सापळा रचून रंगेहात अटक करण्यात आली.
तक्रारदाराने वडिलांच्या नावावरील भूखंडासाठी शासकीय शुल्क भरून अर्ज केला होता. मात्र अर्जात त्रुटी असल्याचे सांगत परिरक्षक भूमापक विश्वजीत सोनवणे यांनी लाचेची मागणी केली. पुढे त्यांनी कार्यालयीन सहाय्यक सचिन वाजपे यांच्याकडे पाठवले, ज्यांनीही तीच मागणी कायम ठेवली.
तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली. पडताळणीनंतर १२ मे रोजी सापळा रचण्यात आला आणि दोघांनाही प्रत्यक्ष पैसे स्वीकारताना पकडण्यात आले.
या घटनेमुळे महसूल विभागातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा उघड झाला असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. संबंधित आरोपींवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे.










Total Users : 3276394