बुलढाणा (हॅलो बुलढाणा) महसूल प्रशासनातील ढिलाईवर अखेर सरकारचा चाबूक फिरला असून, चिखलीचे उपविभागीय अधिकारी भूषण पाटील यांना तडकाफडकी एक महिन्याच्या सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतः चिखली दौऱ्यात ही कारवाई करत प्रशासनाला जबर धक्का दिला.
राज्य सरकारने 25 मार्च रोजी नागरिकांची घरे नियमित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. मात्र, चिखली महसूल विभागात या निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत होत्या. आज घेतलेल्या आढावा बैठकीत प्रांत अधिकारी भूषण पाटील यांनी शासन निर्णयाकडे दुर्लक्ष केल्याचे उघड होताच, बावनकुळे यांनी क्षणाचाही विलंब न लावता कारवाईचा बडगा उगारला.
या घटनेमुळे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. सरकारचे आदेश पाळलेच पाहिजेत, अन्यथा परिणामांना सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट संदेश बावनकुळे यांनी दिला.
दरम्यान, अवैध वाळू उपशावरूनही त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. जिल्ह्यात सुरू असलेल्या वाळू माफियांच्या कारवायांवर नियंत्रण न आल्यास जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनाच थेट जबाबदार धरले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. नागरिकांनी व पत्रकारांनी अवैध वाळू वाहतुकीची माहिती थेट त्यांच्या व्हॉट्सॲपवर देण्याचे आवाहन त्यांनी केले.
पारदर्शक आणि गतिमान कारभारात कोणतीही कुचराई खपवून घेतली जाणार नाही, असे ठणकावत बावनकुळे यांनी पुढील महिन्यात पुन्हा आढावा घेणार असल्याचे स्पष्ट केले. या धडाकेबाज कारवाईमुळे जिल्ह्यातील कामचुकार अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले असून, प्रशासनात खळबळ उडाली आहे.










