बुलढाणा (हॅलो बुलडाणा) प्रशासनात वेग, पारदर्शकता आणि जनसामान्यांचा विश्वास – या तिन्ही गोष्टी एकत्र आणत बुलढाण्याने पुन्हा एकदा राज्याला दिशा दाखवली आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी राबविलेल्या ‘सहज प्रणाली’ या उपक्रमाची राज्यस्तरावर दखल घेत त्यांचा विशेष सन्मान होणार आहे.
२८ एप्रिल रोजी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात होणाऱ्या ‘द्वितीय सेवा हक्क दिन’ सोहळ्यात राज्याचे मुख्य सचिव यांच्या हस्ते हा गौरव केला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
डॉ. पाटील यांच्या ‘सहज प्रणाली’मुळे शासकीय सेवा अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक झाल्या. नागरिकांचा वेळ वाचला, धावपळ कमी झाली आणि प्रशासनाबद्दल विश्वास वाढला यामुळेच हा उपक्रम आता राज्यासाठी आदर्श ठरत आहे.
बुलढाण्यातील हा ‘पॅटर्न’ आता राज्यातील इतर जिल्ह्यांसाठी मार्गदर्शक ठरणार असून, प्रशासनात बदलाची नवी लाट निर्माण होण्याची चिन्हे आहेत. डॉ. किरण पाटील यांच्या या कामगिरीने बुलढाण्याचे नाव पुन्हा एकदा राज्याच्या नकाशावर ठळकपणे उमटवले आहे.










